राष्ट्रपतींच्या हस्ते स्त्री शक्ती पुरस्कार आणि नारी शक्ती पुरस्कार 2014 प्रदान

0
16

दिल्ली(प्रतिनिधी)महिला सबलीकरणासाठी त्यांच्या जीवनावर परिणाम करणाऱ्या सामाजिक, आर्थिक किंवा राजकीय क्षेत्रासह सर्वच बाबींचं प्रभावी अभिसरण आवश्यक असल्याचं राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी म्हटलं आहे. आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त राष्ट्रपती भवनात 2014 चे स्त्री शक्ती पुरस्कार आणि नारी शक्ती पुरस्कार प्रदान करताना ते बोलत होते.

आंतरराष्ट्रीय महिला दिनाचं औचित्य साधून स्त्री-पुरुष समानतेप्रती आणि भारतातल्या महिलांच्या सबलीकरणासाठी आपली कटिबध्दता पुन्हा दृढ करुया असं राष्ट्रपतींनी म्हटलं आहे. यामुळे त्यांच्या सर्व क्षमतांची त्यांना जाणीव होऊन देशाच्या विकासात त्या सर्वार्थानं सहभागी होऊ शकतील असंही राष्ट्रपती म्हणाले.

महिला सबलीकरण आणि समानता, स्त्री स्वातंत्र्य, प्रतिष्ठा ही आपली उद्दिष्ट नव्हेत तर तो त्यांचा हक्क आहे. 3000 वर्षांपेक्षा अधिक काळाहून असणाऱ्या आपल्या प्राचीन समाजाच्या आचार-विचारांचा तो महत्त्वाचा घटक आहे, असं राष्ट्रपती म्हणाले. स्वतंत्र भारताच्या धुरिणांनी राज्य घटना तयार करताना राज्यघटनेची तत्त्वं आणि तरतुदीत महिलांचे हक्क आणि समानतेवर भर राहील यावर कटाक्ष ठेवला. केंद्र आणि राज्य सरकारंही महिला विकासाला प्राधान्य देत असल्याचं राष्ट्रपतींनी सांगितलं.

तथापि देशाच्या सामाजिक आणि आर्थिक क्षेत्रात भारतीय महिलांची स्थिती सुधारण्यात सामाजिक संकल्पना आणि दृष्टीकोन अडथळे ठरत आहेत. यासंदर्भात व्यक्तीगत आणि सामूहिक तातडीच्या आत्मपरीक्षणाची गरज आहे. यासंदर्भातल्या त्रुटी आणि त्यांची कारणं मुळापासून जाणून घेतली पाहिजेत. महिलांच्या आर्थिक आणि सामाजिक कायापालटासाठी संरचनात्मक आणि संस्थात्मक अडथळे दूर करण्यासाठी आपण प्रयत्न करायला हवेत. उदा. महिलांविरुद्धचा हिंसाचार, त्यांच्या सुरक्षिततेला तसंच देशभरातल्या महिला आणि मुलीच्या क्षमतांना धोका निर्माण करत आहेत. त्यांच्या असुरक्षिततेमुळे त्यांच्या वावरण्याच्या स्वातंत्र्याच्या, शिक्षण मिळविण्याच्या काम करण्याच्या स्वातंत्र्यावर दबाव येत असल्याचं त्यांनी सांगितलं. स्त्री शक्ती आणि नारी शक्ती पुरस्कार विजेत्यांचे राष्ट्रपतींनी अभिनंदन केले.

हा कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल तसंच चांगलं कार्य करणाऱ्या या पुरस्कार विजेत्यांना प्रोत्साहन दिल्याबद्दल महिला आणि बालकल्याण मंत्रालयाचे राष्ट्रपतींनी आभार मानले.