आरोग्य सचिवांनी वैद्यकीय अधिकार्‍यांना खडसावले

0
15

चंद्रपूर : आरोग्य विभागाच्या मुख्य सचिव सुजाता शौनिक यांनी बुधवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास जिल्हा सामान्य रुग्णालयात अचानक भेट देऊन पाहणी केली. यावेळी रुग्णालयातील गचाळ व्यवस्थेबाबत त्यांनी अधिकार्‍यांना चांगलेच धारेवर धरले. तत्पूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांनी बैठक घेऊन वैद्यकीय महाविद्यालयाच्या दृष्टीने सामान्य रुग्णालयात ज्या त्रुट्या आहेत, त्या दुरूस्त करण्याचे निर्देश दिले.
आरोग्य विभागाच्या मुख्य सचिव सुजाता शौनिक यांचा हा दौरा आकस्मिक असल्याने अधिकार्‍यांनाही याची कल्पना नव्हती. त्यामुळे आरोग्य विभागातील अधिकार्‍यांची चांगलीच तारांबळ उडाली. चंद्रपुरात लवकरच वैद्यकीय महाविद्यालय होणार आहे. येथील जिल्हा सामान्य रुग्णालयही या महाविद्यालयाला संलग्न होणार आहे. त्या दृष्टीने भारतीय आयुर्विज्ञान समितीने सामान्य रुग्णालयात सद्यस्थितीत असलेल्या सुविधांबाबत काही त्रुट्या काढल्या आहेत. त्याची पूर्तता करण्याच्या दृष्टीने सुजाता शौनिक यांनी जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. मुरंबीकर व अधिकार्‍यांना सूचना केल्या. त्यानंतर सुजाता शौनिक यांनी जिल्हा सामान्य रुग्णालयाला भेट दिली. या ठिकाणी शौनिक यांनी सर्व विभागात प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली. रुग्णांची विचारपूसही केली. यावेळी त्यांना गचाळ व्यवस्था दिसून आली. अनेक ठिकाणी दुर्गंधी, कचर्‍याचे साम्राज्य दिसून आले. याबाबत त्यांनी उपस्थित अधिकार्‍यांना व कर्मचार्‍यांना चांगलेच खडसावले. रुग्णालयात कुठेही घाण दिसू नये, याची काटेकोर काळजी घेण्याचे निर्देशही दिले. यावेळी नर्सेस संघटनेच्या वतीने सुजाता शौनिक यांना निवेदन देण्यात येणार होते. मात्र काही अधिकार्‍यांनी परिचारिकांना शौनिक यांच्यापर्यंत पोहचूच दिले नाही. अखेर शौनिक या परतीच्या मार्गावर असताना परिचारिकांना त्यांना त्यांच्या वाहनाजवळ गाठावे लागले.