देशमुखांविरूद्धचा अविश्वास ठराव 44 मतांनी मंजूर

0
13

मुंबई- विधान परिषदेचे सभापती शिवाजीराव देशमुखांविरुद्ध राष्ट्रवादीने आज दुपारी मांडलेला अविश्वास ठरावाचा प्रस्ताव 44 विरूद्ध 22 असा मंजूर झाला आहे. सभापती शिवाजीराव देशमुख यांच्याविरोधात 44 मते मिळाली तर विश्वासाच्या बाजूने 22 मते पडली. शिवसेनेने या मतदानावर बहिष्कार टाकत सभागृहातून बाहेर पडणे पसंत केले. राष्ट्रवादीसाचे आमदार अमरजित पंडित यांनी हा प्रस्ताव मांडला होता.
अविश्वास ठरावाबाबत बोलताना राष्ट्रवादीचे अमरसिंग पंडित म्हणाले, विधान परिषदेचे सभापती शिवाजीराव देशमुख यांच्याविरोधात अविश्वास ठराव मांडण्यात आला आहे. विधान परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसची सदस्यसंख्या सर्वाधिक आहे. त्यामुळे आम्हाला विरोधी पक्षनेतेपद मिळणे क्रमप्राप्त होते. डिसेंबर 2014 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने तशी मागणीही केली होती. पण सभापती महोदयांनी निर्णय घेण्यात विलंब केला. त्यामुळे आम्ही त्यांच्याविरोधात भारतीय संविधान अनुच्छेद 183 (ग) आणि विधान परिषद नियम 11 अन्वये अविश्वासचा प्रस्ताव दाखल केला आहे, असे अमरसिंह पंडित यांनी स्पष्ट केले.
राष्ट्रवादीकडे २८ आमदारांचे संख्याबळ होते. उरलेली पोकळी भरून काढण्यासाठी भाजपाच्या १२ आमदारांनी राष्ट्रवादीला साथ दिली आणि एकूण ४४ मते मिळून अविश्वासदर्शक ठराव मंजूर झाला.शिवसेनेचे विधानपरिषदेत सात आमदार असून ते या प्रस्तावावर बहिष्कार टाकला.
राष्ट्रवादीने आज प्रस्ताव मांडल्यावर काँग्रेसने राष्ट्रवादीवर जोरदार टीका केली. राष्ट्रवादी काँग्रेसची राज्यातील भूमिका काय असा सवाल काँग्रेसचे आमदार माणिकराव ठाकरे यांनी विचारला. तर शिवसेनेचे आमदार रामदास कदम यांनी तिखट शब्दात भाजपा व राष्ट्रवादीवर हल्लाबोल केला. राष्ट्रवादीने काँग्रेसला तर भाजपाने शिवसेनेला फसवलं असून भाजपा व राष्ट्रवादी कधी एकत्र आले हे आम्हालाही कळले नाही असे कदम यांनी सांगितले. यावर भाजपा आमदारांनी जोरदार आक्षेप नोंदवला.