कोळसा घोटाळ्याकडे मनमोहन यांचे दुर्लक्ष, अहिर यांचा आरोप

0
7

मुंबई- कोळसा घोटाळ्यात तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी गैरव्यवहार केला नाही. मात्र त्यांनी या घोटाळ्याकडे डोळेझाक केल्याची प्रतिक्रिया केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहिर यांनी सोमवारी येथे दिली. डॉ. सिंग यांच्या समर्थनार्थ काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी मोर्चा काढून न्यायालयावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला, असाही आरोप त्यांनी केला.
अहिर म्हणाले, देशात कोळशाचा साठा मोठ्या प्रमाणात आहे. परंतु, कोळसा खाण वाटपात घोटाळा झाल्याने आणि खाणपट्ट्यांचे योग्यरीत्या खनन न केल्यानेच गेल्या पाच वर्षांत तुटवडा निर्माण झाला होता. योग्यरीत्या खनन झाले असते तर कोळशाचा तुटवडा निर्माण झाला नसता. आपल्याला परदेशातून कोळसाही आयात करावा लागला नसता. मात्र आता कोळशाचे उत्पादन वाढणार असल्याने एक किलोही कोळसा आयात करावा लागणार नाही.

कोळशापासून युरिया : कोळशापासून युरिया तयार करण्याची केंद्र सरकारची योजना आहे. शेतकऱ्यांना युरियाची आवश्यकता भासते. केंद्र सरकार यापोटी ७६ हजार कोटी रुपयांची सबसिडी देते. २० हजार प्रतिटन युरिया असताना शेतकऱ्यांना तो फक्त पाच हजारांना दिला जातो. हा स्वस्त युरिया श्रीलंका, बांग्लादेश, नेपाळमध्ये अवैध मार्गाने पाठवला जातो आणि तेथे तो २८ ते ३० हजार रुपयांनी विकला जातो. काही कंपन्यांही शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणावर युरिया विकत घेतात. त्यामुळे त्याचा तुटवडा जाणवतो. चीनमध्ये कोळशापासून युरिया निर्माण केला जातो, त्याच धर्तीवर चंद्रपुरात असा प्रकल्प उभारणार असल्याचे अहिर यांनी सांगितले.