कारागृह प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे कैदी पळाले

0
9

वृत्तसंस्था
नागपूर,दि.2 – कारागृहातून कुख्यात कैदी पळून जाणे ही अतिशय गंभीर बाब आहे. या घटनेला कारागृह प्रशासनाचा हलगर्जीपणा जबाबदार आहे. या प्रकरणाची तीन दिवसांत विभागीय चौकशी पूर्ण होईल. घटनेसंदर्भात कैदी, कारागृह अधिकारी व पोलिसांशी चर्चा केली असून, सुरक्षेमध्ये कमी पडल्यामुळे ही घटना घडल्याची कबुली अतिरिक्‍त पोलिस महासंचालक (कारागृह) मीरा बोरवणकर यांनी दिली. त्या बुधवारी चार वाजता नागपूर मध्यवर्ती कारागृहात आल्या होत्या. त्यांनी कारागृहातील बडीगोल परिसरातील घटनास्थळाची पाहणी केली. बॅरेक क्रमांक सहामध्ये असलेल्या काही कैद्यांची चौकशी केली. तसेच घटनेच्या वेळी बॅरेकजवळ तैनात असलेल्या सुरक्षारक्षक व तुरुंगाधिकारी यांचीही चौकशी केली. ज्या भिंतीवरून पाचही कैद्यांनी उडी मारून पळ काढला, ती भिंत आणि कारागृहामागील परिसराचीही पाहणी या वेळी बोरवणकर यांनी केली.

कारागृहातून कुख्यात पाच आरोपी पळून गेल्यामुळे नाचक्‍की झालेल्या कारागृह प्रशासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली. सकाळी दहा वाजताच अप्पर पोलिस महासंचालक मीरा बोरवणकर या नागपुरात दाखल झाल्या. त्या दुपारी चारच्या सुमारास कारागृहात गेल्या. रात्री आठपर्यंत त्यांनी कारागृह अधिकाऱ्यांशी चर्चा करीत घटनेबाबत सविस्तर माहिती घेतली. धंतोली पोलिसांनी दिवसभर कैदी व कारागृहातील काही कर्मचाऱ्यांचे बयाण घेतले. नागपूर मध्यवर्ती कारागृहातून कुख्यात कैदी बिसेनसिंग उईके (वय 35, शिवणी – मध्य प्रदेश), मोहम्मद शोएब (मानकापूर), सत्येंद्र गुप्ता (वय 24, कामठी), प्रेम खत्री (रा. नेपाळ) आणि आकाश ठाकूर (वय 22, गिट्‌टीखदान) हे मंगळवारी रात्री दोन ते चारच्या सुमारास बॅरेकच्या सळाखी कापून पळून गेले. या घटनेनंतर एकच खळबळ उडाली होती. त्यांच्याविरुद्ध मध्यवर्ती कारागृहाचे कर्मचारी रवींद्र पारेकर यांच्या तक्रारीवरून धंतोली पोलिसांनी गुन्हा दाखल केला. नागपूर पोलिस कारागृहातून पळून गेलेल्या कैद्यांचा शोध घेत आहेत. सर्व कैदी महाराष्ट्राबाहेर पळाल्याची शक्‍यता पोलिसांनी वर्तवली आहे.
मीरा बोरवणकर म्हणाल्या, कारागृह प्रशासनाच्या बेजबाबदारपणामुळे ही घटना घडली. कारागृहात अनियमितता असल्यामुळेच अशा प्रकारच्या घटनेस सोमोरे जावे लागले. याप्रकरणी कर्तव्यात कसूर करणारे कारागृह अधीक्षक वैभव कांबळे यांना निलंबित करण्यात आले आहे. त्यांना यापूर्वीही निलंबित करण्यात आले होते. त्यांच्याविरोधात आतापर्यंत 53 “डिफॉल्ट रिपोर्ट‘ कारागृह महासंचालक कार्यालयात प्राप्त झाले होते. त्याप्रकरणी त्यांची विभागीय चौकशी सुरू होती. चौकशीचा अहवाल येण्यापूर्वीच त्यांना निलंबित करण्यात आले. मध्यवर्ती कारागृहात मोबाईल आणि सिमकार्ड सापडत असल्याच्या प्रश्‍नावर बोरवणकर म्हणाल्या, नागपूर मध्यवर्ती कारागृह प्रशासनात अनियमितता आहे. त्यामुळे कैद्यांकडे मोबाईल आणि सिमकार्ड पोहोचत आहेत. मात्र, या प्रकरणीही विभागीय चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. कैदी पळाल्याच्या घटनेची चौकशी तीन दिवसांत पूर्ण करणार आहोत.

कैद्यांच्या शोधासाठी गुन्हे शाखेची पथके रवाना
मध्यवर्ती कारागृहातून पळून गेलेल्या कुख्यात पाचही कैद्यांच्या शोधासाठी गुन्हे शाखेने चार पथके तयारी केली आहेत. तसेच धंतोली स्टेशनचीही दोन पथके रवाना झाली आहेत. पळून गेलेल्यांमध्ये तीन कैदी गिट्टीखदान, कामठी, कोराडी परिसरातील रहिवासी आहेत. त्यामुळे या तिन्ही पोलिस ठाण्यांतील काही कर्मचाऱ्यांचा समावेश पथकांमध्ये केला आहे. कैद्यांना लवकरच अटक करण्यात येईल, असा विश्‍वास पोलिसांनी व्यक्‍त केला.