राज्यात कायदा-सुव्यवस्थेचे धिंडवडे – धनंजय मुंडे

0
23

मुंबई,दि.2 – राज्यात कायदा आणि सुव्यवस्था चांगली असल्याचा दावा करणार आणि गृह खाते सांभाळणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या नागपुरातच काय चालले आहे, असा सवाल करतानाच राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचे धिंडवडे निघाले आहेत, असा घणाघाती आरोप विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी बुधवारी केला.

नागपूर येथील कारागृहातून पाच कुख्यात कैद्यांचे फरारी होणे आणि नगर जिल्ह्यातील बलात्कारप्रकरणी नियम 297 अन्वये चर्चा करण्याची मागणी मुंडे आणि सुनील तटकरे यांनी प्रश्‍नोत्तराच्या तासादरम्यान केली. कायदा-सुव्यवस्थेच्या मुद्यावर सभागृहाचे कामकाज पाच वेळा तहकूब करावे लागले. त्यानंतर नियम 97 अन्वये अल्पकालीन चर्चेस सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी मान्यता दिली. त्यानंतर मुंडे यांनी सरकारविरोधात जोरदार टीकास्त्र सोडले.
नागपुरातील “जेल अंग्रेजोके जमाने का जेल झाले‘ असल्याचे स्पष्ट करून मुंडे म्हणाले, की तुरुंग हे कैद्यांचे “रेस्ट हाउस‘ झाले आहेत. तेथे पंचतारांकित हॉटेलप्रमाणे गुन्हेगारांना सुविधा दिल्या जातात. कारागृह अधीक्षक वैभव कांबळे आपल्या कार्यालयात गुन्हेगारांचे वाढदिवस साजरे करतात. मोक्काअंतर्गत कारवाई करण्यात आलेले पाच कैदी पळून गेल्यानंतर फक्त एकाच अधिकाऱ्यावर कारवाई करून सरकार शांत बसले आहे; तसेच नागपुरात तडीपार गुंडाने युवतीला नग्न करून केलेली मारहाण, मुंबईत गुन्हेगारांना डान्स बारमध्ये घेऊन जाणारे पोलिस आणि नेवासा (जि. नगर) येथील बलात्कार प्रकरण हे राज्याला काळिमा फासणारे आहे.

सिंहस्थ कुंभमेळ्याचे ब्रॅंडिंग करा ः मुख्यमंत्री
नाशिक येथील सिंहस्थ कुंभमेळा हा “ब्रॅंडिंग‘ करून महाराष्ट्राचे आणि नाशिकचेही स्थान पर्यटन क्षेत्रात सुस्थापित करा, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत केले. कुंभमेळ्यासाठी 2 हजार 629 कोटींच्या निधीची आवश्‍यकता असून 2014-15 या आर्थिक वर्षात 312 कोटी देण्यात आल्याचे त्यांनी जयवंत जाधव व इतर सदस्यांच्या प्रश्‍नाला उत्तर देताना सांगितले.

“संजय गांधी‘ योजनेच्या मदतीत वाढ होणार
संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना दिली जाणारी मदत 900 रुपयांपर्यंत वाढविण्यासाठी राज्य सरकार प्रयत्न करीत असल्याची माहिती सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी विधानसभेत दिली. विधानसभेत प्रश्‍नोत्तराच्या तासात जयंत पाटील यांनी उत्पन्नाची मर्यादा 21 हजारांवरून 44 हजार करावी, अशी मागणी केली होती.

कोल्हापूर टोलबाबत लवकरच निर्णय : शिंदे
कोल्हापुरातील टोलबाबत लवकरच सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असे सारवासारव करणारे उत्तर सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्याने विधानसभेत चंद्रदीप नरके, राजेश क्षीरसागर यांनी आवाज उठविण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो निष्फळ ठरला. या वेळी शिंदे म्हणाले, की कोल्हापूरबरोबरच राज्यातील टोलविषयी याविषयी समिती नियुक्‍त करण्यात आली आहे. तिचा निर्णय आल्यानंतर कोल्हापूरबाबतही सकारात्मक निर्णय होईल.