डॉ. आंबेडकर होते घरवापसीचे समर्थक – RSS चा दावा

0
5

नवी दिल्ली- डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे जगभरात दलित नेते व भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हणून प्रसिद्ध असले तरी आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आंबेडकर यांचा हिंदूत्ववादी चेहरा समोर आणण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. आंबेडकर हे इस्लाम समर्थकांनी राबवलेल्या धर्मांतराच्या मोहीमेविरोधात होते. धर्मांतर केलेल्यांनी पुन्हा हिंदू धर्म स्वीकारल्यास त्यांचे स्वागतच करु हीच आंबेडकर यांची भूमिका होते असे संघाच्या मुखपत्रातून सांगितले जाणार आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पांचजन्य व ऑर्गनायझर या दोन्ही मुखपत्रांमध्ये आंबेडकर यांच्या १२५ जयंती निमित्त २०० पानांचा विशेष अंक प्रकाशित होणार आहे. यापूर्वी संघाच्या मुखपत्राने ऐवढा मोठा विशेष अंक कधीही प्रकाशित केला नव्हता. संघाचे संस्थापक के . बी. हेडगेवार, रामजन्मभूमी याच विषयांवर संघाच्या मुखपत्राचे विशेष अंक सिमीत असायचे. पण यंदा संघाने थेट आंबेडकर यांच्यावर २०० पानी विशेष अंक काढून प्रतिमा बदलण्याचा प्रयत्न केला आहे.
इस्लामचे आक्रमण, पाकिस्तान, हिंदूचे धर्मांतरण या विषयांवर बाबासाहेबांनी मांडेलेली रोखठोख मतं या अंकात मांडली जाणार आहेत. पाकिस्तान व हैद्राबाद प्रांतामध्ये आदिवासी हिंदूंना मुस्लीम धर्म स्वीकारायला लावले जात होते. या मोहिमेचा आंबेडकरांनी प्रखर विरोध केला होता. तसेच धर्मांतर केलेल्यांनी पुन्हा हिंदू धर्म स्वीकारला तर त्यांचे स्वागतच असेल असे आंबेडकर यांनी म्हटल्याचा उल्लेख या अंकात केला जाणार आहे. आंबेडकर यांचे भाषण, लेख या सर्वांच्या आधारेच आम्ही हा अंक तयार केल्याचे ऑर्गनायझरचे संपादक प्रफुल्ल केतकर यांनी सांगितले. आंबेडकर हे फक्त दलितांचे नेते नसून ते संपूर्ण भारताचे नेते होते असे केतकर यांनी नमूद केले. संघाची प्रतिमा बदलून दलित वर्गालाही संघाकडे आकर्षित करण्यासाठी संघाने आंबेडकरांवर विशेष अंक प्रकाशित करण्याचा निर्णय घेतला असावा असे राजकीय तज्ज्ञांचे मत आहे.