महाराष्ट्रदिनी ध्वजवंदनाचा मान आता लोकप्रतिनिधींना

0
10

मुंबई – महाराष्ट्रदिनी (1 मे) यापुढे लोकप्रतिनिधींना ध्वजवंदन करण्याचा मान राज्य सरकारने दिला आहे. मात्र, महाराष्ट्र दिनापुरताच हा मान देण्यात आला असून, 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला मात्र पूर्वीप्रमाणेच तहसीलदारांच्याच हस्ते ध्वजवंदनाची परंपरा कायम राहणार आहे.

महाराष्ट्र दिनी मुंबईमध्ये राज्यपालांच्या हस्ते, विभागीय आयुक्‍तालय आणि जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजवंदन केले जाते. मात्र, तालुक्‍याच्या मुख्यालयात तहसीलदारांच्या हस्ते होणाऱ्या ध्वजवंदनावर आमदारांनी आक्षेप घेत हा मान लोकप्रतिनिधींना मिळावा, अशी मागणी केली होती. ही मागणी राज्य सरकारने मान्य केली असून, केवळ महाराष्ट्रदिनी तालुक्‍याच्या ठिकाणी आमदारांना ध्वजवंदन करता येणार आहे. ध्वजवंदन करण्यावरून आमदारांमध्ये मानापमान रंगण्याची शक्‍यता असल्याने राजशिष्टाचार विभागाने ज्या विधानसभा मतदार संघामध्ये दोन तालुक्‍यांचे कार्यक्षेत्र समाविष्ट असेल त्या ठिकाणी ज्या मतदारसंघाची मतदार संख्या जास्त असेल, त्या मतदार संघाचे विधानसभा सदस्य ध्वजवंदन करतील हे स्पष्ट केले आहे.

पालकमंत्री जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी ध्वजवंदनासाठी जात असल्याने त्यांच्या मतदारसंघातील तालुक्‍याच्या मुख्यालयात जिल्ह्यातील विधान परिषद किंवा विधानसभा सदस्यांना ध्वजवंदन करण्याची परवानगी देण्यात आलेली आहे. मात्र, त्यांच्या अनुपस्थितीत तहसीलदारच ध्वजवंदन करणार आहेत.