गोंडवाना विद्यापीठाच्या कुलगुरूपदी डॉ. मुरलीधर चांदेकर

0
11

नागपूर – गोंडवाना विद्यापीठाच्या प्रभारी कुलगुरूपदावर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे माजी प्र-कुलगुरू डॉ. मुरलीधर चांदेकर यांची निवड करण्यात आली. गुरुवारी (ता. 23) राज्यपाल कार्यालयातून त्यांच्या निवडीचे पत्र विद्यापीठात प्राप्त झाले.

डॉ. विजय आईंचवार यांचा कार्यकाळ संपल्यावर काही दिवस प्रभारी कुलगुरूपदाची सूत्रे राजीव गांधी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्रोफेसर डॉ. कीर्ती दीक्षित यांच्याकडे देण्यात आली होती. गुरुवारी अचानक राज्यपाल कार्यालयातून डॉ. चांदेकर यांचे नाव आल्याने अनेकांना आश्‍चर्याचा धक्का बसला. डॉ. मुरलीधर चांदेकर यांनी व्हीएमव्ही महाविद्यालयात पाच वर्षे प्राचार्य म्हणून काम केले. याशिवाय त्यांनी नाशिकच्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात वाणिज्य आणि व्यवस्थापन अभ्यासमंडळावर काम केले. ते मुक्त विद्यापीठाच्या व्यवस्थापन मंडळावर सहा वर्षे राज्यपालांचे नामनिर्देशित सदस्य होते. मुंबई विद्यापीठात राज्यपालाकडून नामित सदस्यही होते. नागपूर विद्यापीठाच्या विविध समित्यांवर त्यांनी काम केले आहे. प्राध्यापक म्हणून 20 वर्षांपेक्षा जास्त अनुभव आणि प्राचार्य म्हणून त्यांनी नाशिकच्या महाविद्यालयात काम केले आहे. डॉ. विनायक देशपांडे नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू असताना 11 नोव्हेंबर 2014 ला डॉ. मुरलीधर चांदेकर यांची प्र-कुलगुरू म्हणून निवड केली होती. यादरम्यान परीक्षेच्या कामात गती आणण्याचा प्रयत्न त्यांनी केला. शिवाय विद्यार्थिभिमुख योजना राबविण्याच्या दृष्टीने काम केले. त्यांच्या अनुभवाचा फायदा निश्‍चितच विद्यापीठाला मिळणार आहे. गुरुवारी सायंकाळीच त्यांनी आपल्या पदाची सूत्रे स्वीकारली.