23.5 C
Gondiā
Saturday, August 15, 2026
Home Top News सोनियांच्या संमतीनंतर काँग्रेस-राष्ट्रवादीत ५ तास चर्चा; फाॅर्म्युल्यावर एकमत

सोनियांच्या संमतीनंतर काँग्रेस-राष्ट्रवादीत ५ तास चर्चा; फाॅर्म्युल्यावर एकमत

0
27

नवी दिल्ली,दि.21(वृत्तसंस्था) – शिवसेनेसाेबत सत्तेत सहभागी हाेण्यासाठी पक्षाध्यक्षा साेनिया गांधी यांचे मन वळवण्यात अखेर राज्यातील काँग्रेस नेत्यांना यश आले. साेनियांकडून हाेकार मिळाल्यानंतर काँग्रेस व राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांत बुधवारी रात्री राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या बंगल्यात तब्बल साडेपाच तास खलबते झाली. पवार व काँग्रेस महासचिव अहमद पटेल यांच्यासह दाेन्ही पक्षांचे १५ नेते या वेळी उपस्थित हाेते. किमान समान कार्यक्रमाबाबत यात सुरुवातीच्या टप्प्यात एकमत झाले, नंतर सत्तेतील पदांच्या वाटपाबाबतही चर्चा झाली. ३ तासांच्या चर्चेनंतर काँग्रेसचे नेते अहमद पटेल, मल्लिकार्जुन खरगे साेनियांच्या बंगल्यावर गेले. बैठकीतील चर्चेची माहिती त्यांनी साेनियांना दिली. त्यांचा निराेप घेऊन पुन्हा हे नेते पवारांच्या बंगल्यावर येऊन चर्चेत सहभागी झाले.

या बैठकीला काँग्रेसतर्फे अहमद पटेल, मल्लिकार्जुन खरगे, के. सी. वेणुगोपाल, जयराम रमेश, पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात, व माणिकराव ठाकरे तर राष्ट्रवादीकडून प्रफुल्ल पटेल, अजित पवार, छगन भुजबळ, जयंत पाटील, नवाब मलिक, सुप्रिया सुळे आदी नेते उपस्थित होते.या बैठकीत किमान समान कार्यक्रम काय असावा, सत्तेचे वाटप कसे करावे, अधिकारी वर्ग कायम ठेवावा की बदलावा यांसह अनेक बारीकसारीक मुद्यांवर चर्चा झाली. ही चर्चा यापुढेही सुरू राहणार आहे. मात्र रात्रभरातच चर्चेद्वारे सर्व मुद्दे निकालात काढून येत्या दोन दिवसांत शिवसेनेशी बोलणी केली जातील, असे कळते.राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्याच्या माहितीनुसार, मुख्यमंत्रिपद पहिली अडीच वर्षे सेनेला तर दुसरे अडीच वर्षे राष्ट्रवादीला मिळू शकते. तर उपमुख्यमंत्रिपद पाच वर्षे काँग्रेसला दिले जाऊ शकते. ३० नाेव्हेंबरपूर्वी सरकार सत्तारूढ हाेईल.’ काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, ‘राज्याला स्थिर सरकार देण्याचा आमचा प्रयत्न आहे. गुरुवारी दिल्लीत बैठक हाेईल. शुक्रवारी शिवसेना नेत्यांशी चर्चेनंतर अंतिम निर्णय हाेऊ शकताे.’

साेनियांच्या हाेकारानंतर हालचालींना आला वेग

अहमद पटेल, मल्लिकार्जुन खरगे, के. सी. वेणुगोपाल यांच्यासह राज्यातील प्रमुख काँग्रेस नेत्यांनी बुधवारी दुपारी पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतली. यात सोनियांनी शिवसेनेसोबत सरकार स्थापण्यास हिरवा कंदील दर्शवला. नंतरच दाेन्ही काँग्रेसची पवारांकडे बैठक झाली. यादरम्यान काँग्रेसचे नेते अश्विनीकुमार यांनी संजय राऊत यांच्याशी चर्चा केली.