23.5 C
Gondiā
Saturday, August 15, 2026
Home विदर्भ जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी समन्वयाने काम करा-   जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक

जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी समन्वयाने काम करा-   जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक

0
34
  • सर्व शासकीय विभाग प्रमुखांची बैठक
  • आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या सूचना

वाशिम, दि. २१ : राज्य निवडणूक आयोगाने १९ नोव्हेंबर रोजी जिल्हा परिषद व जिल्ह्यातील सहाही पंचायत समितींच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. कार्यक्रम जाहीर झाल्यापासूनच या निवडणुकीची आचारसंहिता जिल्ह्यात लागू झाली आहे. सर्व शासकीय विभाग व निवडणुकीसाठी नियुक्त नोडल अधिकाऱ्यांनी जिल्ह्यात आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी करावी. तसेच निवडणूक प्रक्रिया सुरळीतपणे व शांततामय वातावरणात पार पाडण्यासाठी समन्वयाने काम करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक यांनी आज दिल्या. आचारसंहिता अंमलबजावणीविषयी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वाकाटक सभागृहात आयोजित सर्व शासकीय विभाग प्रमुखांच्या बैठकीत ते बोलत होते.

यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत परदेशी, जिल्हा परिषदेच्या अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बन्सोड, निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, महसूलचे उपजिल्हाधिकारी आर. डी. काळे, जिल्हा पुरवठा अधिकारी राजेंद्र जाधव, भूसंपादन अधिकारी सुहासिनी गोणेवार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुदाम इस्कापे, कालिदास तापी, ग्रामीण पाणी पुरवठा यंत्रणेचे कार्यकारी अभियंता निलेश राठोड, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था रमेश कटके, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी शंकर तोटावार, समाज कल्याण सहाय्यक आयुक्त माया केदार, शिक्षणाधिकारी तानाजी नरळे, अंबादास मानकर, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी समरीन सय्यद यांच्यासह विविध शासकीय विभागांचे प्रमुख उपस्थित होते.

जिल्हाधिकारी श्री. मोडक म्हणाले, राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या तारखांनुसार जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीकरिता ७ जानेवारी २०२० रोजी मतदान होणार आहे. या कालावधीत जिल्ह्यात आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी सर्व शासकीय यंत्रणांनी सतर्क रहावे. आचारसंहिता कालावधीत शासकीय वाहन, शासकीय कार्यालये अथवा कोणत्याही शासकीय इमारतीचा राजकीय कारणासाठी वापर केला जाणार नाही, याची दक्षता घ्यावी. सार्वजनिक ठिकाणी लावण्यात आलेले विविध राजकीय जाहिरात फलक, मजकूर व झेंडे काढून घेण्याची कार्यवाही सर्व नगरपरिषदा व स्थानिक स्वराज्य संस्थांनी पूर्ण करून त्याचा अहवाल जिल्हास्तरीय आचारसंहिता कक्षाला सादर करावा.

आचारसंहितेचा भंग होईल अशी कृती कोणत्याही शासकीय विभागाकडून होता कामा नये. आचारसंहितेच्या अंमलबजावणीविषयी कोणत्याही स्वरूपाच्या शंका असल्यास संबंधित शासकीय विभागांनी जिल्हाधिकारी कार्यालयाशी संपर्क साधून शंकांचे निरसन करून घ्यावे, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी केले.जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. परदेशी म्हणाले, निवडणूक कालावधीत सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करणे आवश्यक आहे. निवडणुका शांततेत पार पाडण्यासाठी पोलीस दल सज्ज असून आचारसंहितेचा भंग करणारे तसेच कायदा व सुव्यवस्थेला बाधा पोहोचविण्याचा प्रयत्न करणाऱ्यांविरोधात तातडीने कारवाई करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.