मुंबई(वृत्तसंस्था)दि.06- ”दिल्लीतील जेएनयूमध्ये झालेला हल्ला हा मुंबईत झालेल्या 26/11 च्या हल्ल्याची आठवण करून देणारा आहे. पण, महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनी घाबरुन जाण्याची गरज नाही. मी महाराष्ट्रात असा प्रकार खपवून घेणार नाही,” असे मत मुखमंत्री उद्धव ठाकरेंनी मांडले. जवाहरलाल नेहरु विद्यापीठात झालेल्या हल्ल्यावर माध्यमांसमोर बोल होते. यावेळी मुख्यमंत्र्यांनी हल्ल्याचा तीव्र निषेध नोंदवला आहे.यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, ” जेएनयूच्या हल्ल्याने 26/11 हल्ल्याची आठवण आली. जर विद्यार्थी त्यांच्याच वसतिगृहातही सुरक्षित नसतील, तर देशाची परिस्थिती अवघड आहे. भारतात सरकार कुणाचंही असो हे हल्ले सहन केले जाणार नाहीत. पण, महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनी निश्चिंत राहावं, राज्यात असा कोणताही प्रकार सहन करणार नाही”, असे ठाकरे म्हणाले.
पुढे बोलताना ते म्हणाले की, “देशात जी काही अस्थिरता निर्माण झालीय त्याबाबत विचार करण्याची गरज आहे. बुरखाधारी डरपोक आहेत, त्यांचा शोध घेऊन कडक कारवाई झाली पाहिजे. त्यांना बुरखा घालण्याची गरज कारण ते डरपोक होते. असे हल्ले महाराष्ट्रात खपवून घेतले जाणार नाही. विरोध तर होणारच, जे कोणी जबाबदार आहेत त्यांना शोधून त्यांच्यावर कारवाई होणे गरजेचे आहे. यात मी कोणतंही राजकारण करू इच्छित नाही, यामागचा खरा चेहरा समोर आणण गरजेचे. यात पोलिसांचं कर्तव्य आहे त्यांनी कारवाई न केल्यास ते सुद्धा संशयास्पद,” असे उद्धव ठाकरे म्हणाले.
जितेंद्र आव्हाडांची विद्यार्थ्यांना साथ
जेएनयू परिसरात झालेल्या हिंसाचाराचा गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी तीव्र शब्दात निषेध केला. जेएनयू येथे घडलेल्या हिंसाचाराच्या निषेधार्थ मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया येथे काही विद्यार्थी संघटनांनी आंदोलन सुरू केले, या आंदोलनात जितेंद्र आव्हाडांनी सहभागी घेतला. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्यावर आव्हाडांनी निशाना साधला. ते म्हणाले. “पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आता जवाहरलाल नेहरु विद्यालयात (जेएनयू) विद्यार्थ्यांच्या बुद्धिमतेला घाबरत आहेत. जेव्हा विचारसरणी किंवा बुद्धिमतेला सरकार घाबरतं तेव्हा देशात अराजकता येण्याची शक्यता असते.”कालचा जेएनयूचा प्रकार म्हणजे या सरकारने आता गुंडांना हाताशी धरलेले आहे, असं काहीसं चित्र दिसतंय. पोलिसांच्या समोर जेएनयूच्या विद्यार्थी आणि विद्यार्थ्यीनींना मारण्यात आलं. हे क्रूर आहे. लोकशाहीची संपूर्णपणे हत्या केली जात आहे आणि हा सरकारप्रेरित हिंसाचार आहे’, असा घणाघात जितेंद्र आव्हाड यांनी केला.





