अर्जुनी मोर(संतोष रोकडे),दि.०७ः- तालुक्यात गेल्या अनेक दिवसापांसुन बिबट्यांचा वावर गावखेड्यात वाढल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झालेले आहे.गेल्या काही दिवसापुर्वीच नवेगावबांध येथील एका घरातून बिबट्याला जेरबंद करुन जंगलात सोडण्यात आले होते,ती भिती दूर व्हायची असतानाच आज मंगळवारला सकाळच्या सुमारास तालुक्यातील बाक्टी येथील श्रीराम शेंडे यांच्या घरातील स्नानगृहात बिबट्याने आश्रय घेतल्याचे बघावयास मिळाले.सकाळी साडे सहा वाजेच्या सुमारास शेंडे यांच्या स्नानगृहात बिबटयाने ठाण मांडल्याचे लक्षात येताच वनविभागाला माहिती देण्यात आली.वनविभागाच्या रेस्कुपथकानेही वेळ न गमावता सरळ बाक्टीकडे धाव घेत बिबट्याला जेरबंद करण्यासाठी प्रयत्न सुरु केले.तब्बल पाच तासाच्या परिश्रमानंतर बिबट्याला जेरबंद करण्यात आले.गेल्या चारपाच दिवसापासून गावाभवती असलेल्या उसाच्या शेत व जंगलभागात बिबट्याचा वावर असल्याचे नागरिकांच्या लक्षात होते.मात्र आज मंगळवारला सकाळच्या सुमारास तो बिबट जंगलसोडून गावातील शेंडे यांच्या घरातील स्नानगृहात असल्याचे कळताच गावातील नागरिकांची बघण्यासाठी एकच गर्दी उसळली होती.प्रादेशिक वनविभाग नवेगावबांध व साकोली येथील चमूने सहाय्यक वनसरंक्षक डी.व्ही.राऊत,सदगीर यांच्या मार्गदर्शनात वनक्षेत्र अधिकारी रोशन दोनोडे,,दर्शना पाटील,सहा.वनक्षेत्रअधिकारी एल.के.सरकार,पशुवैद्यकिय अधिकारी डॉ.खोडस्कर यांच्या नेतृत्वात दुपारी १ च्या सुमाराल त्या बिबट्याला जेरबंद करण्यात आले.





