सडक अर्जुनी,दि.07ः- तालुका मुख्यालय असलेल्या नगरपंचायत क्षेत्रातंर्गत येणार्या नागरिकांना गेल्या काही वर्षापासून पाणी टंचाईला सामोरे जावे लागत असल्याने नागरिकांत मोठा असंतोष दिसून येत आहे.या पाणीटंचाईमुळे नगरपंचायत भागात समस्या निर्माण झाल्याचे लक्षात येताच आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांनी पाणीटंचाईचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी महाराष्ट्र जिवन प्राधिकरणच्या अभियंत्यासह नगरपंचायतीचे नगराध्यक्ष यांच्यासोबत बैठक करुन समस्येचा आढावा घेतला.या बैठकीत नगरपंचायत क्षेत्रातील पाण्याची समस्या कायमस्वरुपी मार्गी काढण्याकरीता नवे नियोजन करण्याचे तसेच ठिकठिकाणी आवश्यकता असलेल्या भागात हातपंप,विंधनविहीरीतून पाण्याची व्यवस्था करण्यासंबधीची सुचना करीत पाणी पुरवठा योजनेचे अंदाजपत्रक तयार करुन ताबडतोब मंत्रालयात सादर करण्याचे निर्देश आ. मनोहर चंद्रिकापुरे यांनी दिले.यासाठी लागणारा निधी शासनाकडून उपलब्ध करुन देण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.बैठकिला.नगराध्यक्ष देवचंद तरोणे,उपाध्यक्ष अभय राऊत,जिवन प्राधिकरण विभागाचे अभियंता सतिश शुषीर, पदाधिकारी व अधिकारी उपस्थित होते.





