विखे यांच्या कारखान्याची एकट्या चंद्रपुरात ५५ पैकी ५२ लाख पेट्या दारूविक्री

0
13

नागपूर दि. 7- माजी कृषिमंत्री आणि महाराष्ट्राचे विद्यमान विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पद्मश्री डाॅ.विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याने चार वर्षांत एकट्या चंद्रपूर जिल्ह्यात ७०४ कोटींची दारूविक्री करून हजारो कुटुंबांचे संसार उद्ध्वस्त केले. आता याच कारखान्याने सर्वेाच्च न्यायालयात याचिका दाखल करून दारूबंदीला विरोध केल्याची माहिती चंद्रपूर येथील दारूबंदीच्या प्रणेत्या आणि श्रमिक एल्गार संघटनेच्या संयोजिका अॅड. पारोमिता गोस्वामी यांनी पत्र परिषदेत दिली.
विखे पाटलांचे चिरंजीव डाॅ. सुजय सध्या या कारखान्याचे व्यवस्थापकीय संचालक आहेत. कारखान्यात तयार होणाऱ्या दारूपैकी ९५ टक्के दारू एकट्या चंद्रपूर जिल्ह्यात विकली जाते. चार वर्षांत ५५ लाख पेट्यांपैकी ५२ लाख ४७ हजार पेट्या या जिल्ह्यात पुरवण्यात आल्याचे कारखान्याने सर्वेाच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत नमूद आहे, असे अॅड. पारोमिता यांनी सांगितले. राॅकेट नावाची दारू चंद्रपूर जिल्ह्यात सर्वाधिक विकली जाते, असे अॅड. पारोमिता यांनी सांगितले.कारखान्याने दाखल केलेल्या याचिकेसंदर्भात अॅड. पारोमिता यांनी काँग्रेसाध्यक्षा सोनिया गांधी यांना पत्र लिहिले आहे. महिलांच्या प्रश्नासाठी आपण लढत असताना आपल्या पक्षाच्या जबाबदार नेत्याने दारूच्या समर्थनाची भूमिका घेणे अनाकलनीय आहे. ही बाब दारूबंदीविरुद्ध लढणाऱ्या महिलांचा अपमान असून काँग्रेसच्या धोरणाच्या विरोधात आहे. तेव्हा आपण विखे यांना याचिका मागे घेण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी अॅड.पारोमिता गोस्वामी यांनी पत्र परिषदेत दिली.