वर्धा,दि.03(विशेष प्रतिनिधी)- महाविद्यालयात शिक्षिका असलेल्या तरुणीला भरचौकात पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न झाल्याची धक्कदायक घटना समोर आली आहे. ही तरुणी सकाळी कामावर जाण्यासाठी निघाली असताना आरोपीने हे कृत्य केले. हिंगणघाट येथे हा प्रकार घडला असून पीडित तरुणीची प्रकृती गंभीर आहे. तिच्यावर नागपूर येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दरम्यान, पोलिसांनी आरोपी विकी नगराळे याला ताब्यात घेतले आहे.
तरुण शिक्षीका ही शहरातील तुळसकर काॅलेज मध्ये शिकविण्यासाठी जात असतांना दोन तरुण आले व तिच्या सोबत शाब्दिक वाद घालून तिच्या अंगावर पेट्रोल टाकून तिला जाळून टाकण्याचा प्रयत्न केला.वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथील नंदेरी चौकात हा प्रकार घडला असून आरोपी विकी नगराळे याने सकाळी कामावर निघालेल्या तरुणीच्या चेहऱ्यावर पेट्रोल फेकून तिला पेटवून दिले आणि फरार झाला. एकतर्फी प्रेमातून ही घटना घडल्याचे पोलीस निरिक्षक सत्यवीर भांदिवर यांनी सांगितले. पीडित तरुणी ज्या बसने रोज महाविद्यालयात कामावर जात होती त्याच बसने नगराळेही दररोज प्रवास करीत असे. मात्र, आज तो या बसमध्ये नव्हता यावरुन त्याने थंड डोक्याने कट रचून हा प्रकार केला, असे पोलिसांचे म्हणणे आहे.





