नवी दिल्ली(वृत्तसंस्था)दि.11 – दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. 70 मतदारसंघातील निकालाचे कल येण्यास सुरुवात झाली आहे. आप 49, भाजपचे 21 उमेदवार आघाडीवर आहेत. तर काँग्रेस सलग दुसऱ्यांदा शून्यावर राहणार असे दिसून येत आहे.दिल्ली विधानसभेच्या 70 जागांसाठी 8 फेब्रुवारी रोजी 62.59% मतदान झाले. दरम्यान निवडणूक आयोगाने मतदानाच्या 24 तासांनंतर मतदानाची टक्केवारी जाहीर केली. आम आदमी पार्टीने यावर आश्चर्य व्यक्त केले आणि म्हणाले की, काहीतरी गडबड आहे. यावेळी आपने ईव्हीएमच्या सुरक्षेवर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केले. दिल्लीत सध्या आम आदमी पार्टीचे सरकार असून भाजपा 22 आणि काँग्रेस 7 वर्षांपासून सत्तेपासून दूर आहेत.
मतमोजणीसाठी तयारी
- आज मतमोजणीनंतर 672 उमेदवारांचे भवितव्य ठरत आहे. यामध्ये 593 पुरुष आणि 79 महिला उमेदवार आहेत. निवडणुकीत 1.46 कोटी मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.
- निवडणूक आयोगाने दिल्लीच्या 11 जिल्ह्यांत 21 ठिकाणी मतमोजणी व्यवस्था केली आहे. यासाठी सुरक्षा तैनात करण्यात आली आहे.
- कॉमनवेल्थ गेम्स स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, एनएसआयटी द्वारका, मीराबाई इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, जीबी पंत इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, सर सीवी रमन आयटीआय, धीरपूर, राजीव गांधी स्टेडियम इत्यादी ठिकाणी या 21 जागांमध्ये समावेश आहे.




