गडचिरोली,दि.17ः- नक्षल्यांचा गड समजल्या जाणाऱ्या अबुजमाड जंगल परिसरात झालेल्या नक्षलवादी आणि गडचिरोलीचे विशेष नक्षल विरोधी दल सी-60 यांच्यात झालेल्या चकमकीमध्ये एक नक्षली ठार झाला तर एका जवानाच्या पिट्ठूतून त्याला नक्षल्यांची गोळी लागल्याची घटना घडली. ही चकमक केव्हा झाली याचा कोणताही ऊल्लेख वार्तापत्रात केलेला नाही.वार्तापत्रात दिलेल्या माहितीनुसार, भामरागड उपविभागात अंतर्गत लाहेरी उपपोलीस स्टेशन पासून 40 किलोमीटर अंतरावरील छत्तीसगड सीमेवरील अबुजमाड जंगल परिसरात नक्षल्यांच्या केंद्रीय समितीचा नेता भूपती याने पोलिसांविरुद्ध कारवाई करण्याच्या इराद्याने उभारलेल्या तळावर सी -60 जवानांनी जोरदार हल्ला चढवून तळ उध्वस्त केला. यावेळी उडालेल्या चकमकीत एक नक्षलवादी ठार झाल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. मात्र पोलिसांना मृत नक्षल्याचे शव मिळू शकले नाही. नक्षली आपल्या सहकाऱ्याचे शव घेऊन पळून जाण्यात यशस्वी झाले असल्याचे या पत्रात म्हटले आहे. त्यांनी एके 47 व एलएमजी रायफलीतून पोलिसांवर गोळीबार केला. परंतु पोलिसांच्या वाढत्या दबावामुळे ते जंगलाचा फायदा घेऊन पळून जाण्यात यशस्वी ठरले.
चकमक संपल्यानंतर सी – 60 दल परतीच्या वाटेवर असताना छत्तीसगडच्या सीमेवरील घमंडी गावाजवळ अबुजमाड क्षेत्रातील फोदेवाडा जंगल परिसरात नक्षल्यांनी पुन्हा हल्ला चढवला. परंतु अभियानावर दक्ष असलेल्या जवानांनी तो हल्ला परतवून लावला. यात एका जवानाच्या पिट्ठूतून नक्षल्यांची गोळी आरपार गेली. मात्र तो जवान बचावला. सदर चकमकीमध्ये दोनशे ते तीनशे नक्षलवाद्यांचा सहभाग असल्याचे पोलीस वार्तापत्रात म्हटले असुुुन त्यांना जेरीस आणण्यात पोलीसांना यश आले असेही म्हटले आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांचे मार्गदर्शनात अप्पर पोलीस अधीक्षक अजय बन्सल यांचे नेतृत्वात ही कामगिरी पार पाडली.





