जयपूर,दि.24(वृत्तसंस्था): राजस्थानच्या सवाईमाधोपूर येथील प्रसिद्ध रणथंभोर टायर रिझर्व्हमधून २६ वाघ गायब झाल्याचे समोर आले आहे. याबाबत राष्ट्रीय वाघ संरक्षण प्राधिकरणाच्या सदस्या आणि खासदार दीया कुमारी यांनी केंद्रीय पर्यावरण आणि वनमंत्री प्रकाश जावडेकर यांना पत्र लिहून याबाबत उच्च स्तरीय चौकशी करण्यात यावी अशी मागणी केली आहे. या पत्रामध्ये राज्य सरकारला सोपविण्यात आलेल्या एका विश्वसनीय रिपोर्टचा उल्लेख करण्यात आलेला आहे. रिपोर्टनुसार, रणथंभोर राष्ट्रीय उद्यानातील ११६ वाघांची परिस्थिती चिंताजनक असून, २६ वाघ गायब झाले आहेत.
दीया कुमारी यांनी पत्रात, उद्यानातील कर्मचाऱ्यांसह वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करण्यात आला आहे. सोबतच त्यांनी या घटनेस जबाबदार अधिकाऱ्यांविरोधात कडक कारवाई करण्यात यावी, जेणेकरून असे पुन्हा घडणार नाही, अशी मागणी देखील केली आहे. मुख्य वन्यजीव वॉर्डन असलेले अरिंधम तोमर म्हणाले की, हे वाघ २०१२ ते २०१८ या काळात गायब झालेले आहेत. एक एक करून आम्ही या वाघांचा मागोवा घेत आहोत. त्यांचे शव सापडले नसल्याने ते गायब झाले आहेत, असे म्हणता येईल.





