तिरोडा तालुक्यातील घोटी येथे सामूहिक शेती प्रकल्पाला सुरुवात

0
11

तिरोडा,दि.26ः-तालुक्यातील मंगेझरी गटग्रामपंचायतंर्गत येत असलेल्या घोटी येथे सामूहिक शेतीप्रकल्पाला जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरवात करण्यात आली आहे.सदर प्रकल्पांतर्गत ग्राम घोटी येथील पाझर तलाव, बोदलकसा तलावाचा भाग खोलीकरण करणे,100 एकर शेतीला सामूहिक कुंपण करणे, श्री पद्धतीने सेंद्रिय भात शेती करणे, मुरघास प्रकल्प निर्मिती करण्यासाठी मका लागवड करणे, पशुपालन व दुग्ध व्यवसायाला प्रोत्साहन देणे तसेच भाजीपाला लागवड इत्यादी उपक्रम राबविले जाणार आहेत.
सदर प्रकल्पाची सुरुवात जिल्हा प्रशासन, महिला आर्थिक विकास महामंडळ गोंदिया, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प देवरी कृषी विभाग तिरोडा, आणि वनविभाग यांची संयुक्तपणे समन्वय बैठक घोटी येथे घेऊन करण्यात आली असून तलाव खोलीकरण व श्री पद्धतीने भात लागवडीला सुरुवात करण्यात आली आहे. सर्वप्रथम श्री पद्धतीने सेंद्रिय भात लागवड करण्यासाठी घोटी येथील सर्व महिला पुरुष शेतकऱ्यांची बैठक घेऊन अदानी फाउंडेशन तिरोडा तर्फे श्री पद्धतीने सेंद्रिय भात लागवड करण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. या प्रशिक्षणामध्ये बीज प्रक्रिया, नर्सरी तयार करणे ,रोवणी पूर्व जमीन तयार करणे, मार्किंग रोपच्या साह्याने रोवणी करणे, पाण्याचे नियोजन, तन नियंत्रण ,श्री पद्धतीचे एकूण फायदे तसेच घरच्या घरी सेंद्रिय किटनियंत्रके व खते तयार करणे याविषयी संपूर्ण मार्गदर्शन करण्यात आले.माहितीपत्रक शेतकऱ्यांना देण्यात आले.तसेच बीज प्रक्रिया नर्सरी तयार करणे मार्किंग रोपच्या साह्याने रोवणी करणे आणि निंदन यंत्राद्वारे निंदन करणे इत्यादी क्रियांचे गावातील शेतातच प्रात्यक्षिके घेण्यात आली.श्री पद्धतीने सेंद्रिय भात लागवड एकूण 50 एकर शेतीमध्ये सामूहिकपणे करण्याचा निर्धार घोटी येथील शेतकऱ्यांनी केला आहे.