सामर्थ्यावर विश्वास ठेऊन स्पर्धा परीक्षेची तयारी करा- हेमकृष्ण पिसदे

0
1
वाढदिवसाच्या शुभेच्छा

देवरी येथील सार्वजनिक वाचनालय व अभ्यासिका केंद्र येथे यशवंतांचा सत्कार

देवरी,दि. २४- विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना ज्या परीक्षेची आपण तयारी करत आहोत, त्या परिक्षेच्या अभ्यासक्रमाचे योग्य नियोजन करावे. आपल्यातील सामर्थ्यावर विश्वास ठेऊन स्पर्धा परीक्षेची तयारी केली तर हमखास यश मिळेल, असे प्रतिपादन देवरी तालुक्यातील चिचेवाडा येथील रहिवासी आणि गेल्या वर्षी राजसेवेत यश संपादन करून नुकतेच मुंबई येथे कामगार कल्याण अधिकारी म्हणून रुजू झालेल्या हेमकृष्ण पिसदे यांनी केले.

स्थानिक देवरी येथील नगर पंचायत कार्यालय आणि दिनबंधू ग्रामीण विकास संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने संचालित  अभ्यासिका केंद्रात आयोजित यशवंत विद्यार्थ्याचा सत्कार समारंभामध्ये सत्कारमूर्ती म्हणून ते बोलत होते. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त प्राचार्य के.सी. शहारे हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्य डॉ.अरुण झिंगरे,संस्थेचे अध्यक्ष कुलदिप लांजेवार,विश्वस्त चेतन उईके आदी मान्यवर उपस्थित होते. पुढे बोलताना श्री पिसदे यांनी स्पर्धा परीक्षेसाठी करावे लागणारे प्रयत्न, वेळेचे व्यवस्थापन, सकारात्मक ऊर्जा, आपला सहवास आणि वर्तन याविषयी उपस्थितांना उत्कृष्ट मार्गदर्शन केले. आपल्या भागातील जास्तीत विद्यार्थी प्रशासकीय सेवेत कसे यशस्वी होतील, यासाठी सर्वांनी सामूहिक प्रयत्न करण्याचे आवाहन ही त्यांनी यावेळी बोलताना केले.

दरम्यान, ज्या शाळेत हेमकृष्ण यांचे माध्यमिक आणि कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षण झाले तेथील तत्कालिन मुख्याध्यापक के.सी.शहारे आणि इतर मान्यवरांच्या हस्ते हेमकृष्ण पिसदे यांचा ग्रामगीता,शाल आणि पुष्पगुच्छ देऊन स्पर्धा परीक्षेत यश संपादन केल्याबद्दल सन्मानित करण्यात आले. यावेळी डॉ.अरुण झिंगरे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची प्राथमिक तयारी कशी केली पाहिजे आणि खूप अभ्यास न करता नेमकं आणि ठराविक अभ्यास करून स्पर्धा परीक्षेत यश कस संपादन करता येईल, याबाबतीत सखोल मार्गदर्शन केले. के.सी.शहारे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून मार्गदर्शन करताना सांगितले की ,आपण ज्या महापुरुषांमुळे आहोत त्या महापुरुषांचा आदर्श डोळ्यासमोर समोर ठेऊन आपण ठरवलेल्या ध्येय गाठण्यासाठी मदत होईल. त्याचबरोबर स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना जर काही प्रश्न सुटत नसतील तर ते प्रश्न समहू संवादातून चर्चा करून त्याचे उत्तर मिळवून घेऊन एकमेकांना प्रोत्साहित करत स्पर्धा प्ररीक्षेत यश लवकर मिळवता येईल, असे प्रतिपादित केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे विश्वस्त चेतन उईके, संचालन हर्षवर्धन मेश्राम तर आभार संस्थेचे अध्यक्ष कुलदिप लांजेवार यांनी मानले. कार्यक्रमाच्या आयोजनाकरिता अभ्यासिका केंद्रातील विद्यार्थ्यांनी सहकार्य केले.