आरोपींना कठोर शिक्षा द्या,जिल्हा कचेरीवर धडकला सर्वपक्षियांचा मोर्चा

0
29

भंडारा दि. ८- : प्रीती पटेल हत्याकांडातील आरोपींना कठोर शिक्षा देण्यात यावी, आरोपींचा बचाव करणार्‍या पोलिसांविरुद्ध कारवाई करण्यात यावी, या प्रकरणाचा खटला जलदगती न्यायालयात चालविण्यात यावा, प्रकरण राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडे वर्ग करण्यात यावे, अश्‍विनी शिंदे व भव्य पटेल यांच्या उपचाराचा खर्च शासनाने द्यावा, यासह भंडारा शहरातील अवैध व्यवसाय, गांजा, ड्रग्स विक्री करणार्‍यांना अटक करण्यात यावी या मागणींसाठी भंडारा शहरात शुक्रवारला सर्वपक्षीय पदाधिकार्‍यांच्यावतीने निषेध मोर्चा काढण्यात आला.
मोर्चा म्हाडा कॉलनीतून काढण्यात आला. शहरातील मुख्य मार्गाने हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. त्यानंतर त्रिमूर्ती चौकात झालेल्या निषेध सभेत भाजपचे आमदार चरण वाघमारे, शिवसेनेचे माजी आमदार नरेंद्र भोंडेकर, राकाँचे धनंजय दलाल, नगराध्यक्ष बाबुराव बागडे, नगरसेवक महेंद्र गडकरी, परमानंद मेश्राम, प्रशांत लांजेवार, आबिद सिद्धीकी यांनी या घटनेचा निषेध नोंदविला. यावेळी आ.वाघमारे म्हणाले, सरकार कुणाचेही असो, जिल्ह्यातील अवैध धंदे बंद झाले नाही तर विरोध करण्यासाठी पुढे राहीन, असे सांगून आरोपींना कठोरातील कठोर शिक्षा देण्याची मागणी केली.
त्यानंतर शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी धीरजकुमार, अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांच्याशी चर्चा करताना शहरातील गुन्हेगारी, अंमली पदार्थांची विक्री व व्यवसायाला पोलिसांची असलेली मूकसंमती या बाबी त्यांच्या लक्षात आणून दिल्या. यावेळी परिषद कक्षात अधिकार्‍यांना नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागले. त्यावेळी जिल्हाधिकारी म्हणाले, कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, अवैध धंद्यांविरोधात प्रशासन कठोर कारवाई करीत आहे. अप्पर पोलीस अधीक्षक बारवकर म्हणाले, अंमली पदार्थ विक्रीविरुद्ध मोहीम सुरू केली असून लवकरच शहर अंमली पदार्थ मुक्त होईल. नागरिकांना अवैध धंद्यांबाबत माहिती मिळाल्यास त्यांनीसुद्धा पोलिसांना माहिती द्यावी. जेणेकरून कारवाई तत्काळ होऊ शकेल, असे सांगितले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी प्रवीण महाजन, उपविभागीय अधिकारी डॉ. संपत खिल्लारी उपस्थित होते.
दि. ३0 जुलै रोजी म्हाडा कॉलनी व समृद्धीनगरात आमिर शेख व सचिन राऊत या दोघांनी दरोडा टाकून प्रिती पटेल या महिलेचा निर्घृण खून केला. अश्‍विनी शिंदे व भव्य पटेल यांच्यावर जीवघेणा हल्ला केल्याने ते गंभीररित्या जखमी झाले. आरोपींनी अंमली पदार्थाच्या नशेत हे हत्याकांड घडवून आणल्याचे तपासात उघडकीस आल्यामुळे अंमली पदार्थाविरुद्ध शहरात संतापाची लाट उसळली आहे. हे अंमली पदार्थ कुठून येतात, याचे हस्तक कोण? याची माहिती पोलिसांना असूनही ते यावर कारवाई करीत नाही. सदर हत्याकांड घडल्यानंतर अंमली पदार्थ विक्रीविरुद्ध शहरात पोलीस प्रशासाविरुद्ध संताप आहे. त्यामुळे सर्वपक्षीय पदाधिकार्‍यांनी जिल्हा प्रशासन व जिल्हा पोलीस विभागाविरुद्ध शुक्रवारला निषेध मोर्चा काढून रोष व्यक्त केला. या मोर्चात नागरिकांनी उत्स्फुर्त सहभाग नोंदविला.
या आंदोलनात होमगार्डचे जिल्हा समादेशक डॉ.श्रीकांत वैरागडे, जिल्हा परिषद सदस्य प्यारेलाल वाघमारे, प्रेम वनवे, नगरसेवक अँड.विनयमोहन पशिने, मंगेश वंजारी, किरीट पटेल, नगरसेवक सूर्यकांत इलमे, विकास मदनकर, किरण व्यवहारे, सुनील रंभाड, प्रवीण उदापुरे, अँड. प्रभात मिश्रा, नितीन सोनी, अमृत पटेल, धीरज पटेल, संजय मते, विक्की सार्वे, नितीन सोनी, रवि नशिने, प्रदीप देशमुख, अजय तांबे आदींसह शेकडो नागरिक सहभागी झाले होते.