लाचखोर एपीआय, दोन अभियंते जाळ्यात

0
13

गोंदिया दि. ८: शेतकर्‍यांकडून विहीर बांधकामासाठी मिळणार्‍या धनादेशातून दीड हजार रुपये कमिशन मागणार्‍या कनिष्ठ अभियंत्याला शुक्रवारी दुपारी ३.१0 वाजता गोंदिया पंचायत समितीत रंगेहात पकडण्यात आले.
शासनाच्या म.रा.ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत विहीर मंजूर झाल्याने त्या विहिरीच्या बांधकामासाठी देण्यात येणारे धनादेश शेतकर्‍यांना देण्यासाठी कंत्राटी कनिष्ठ अभियंता ओमप्रकाश चुन्नीलाल डहाट (४८) हा पैसे मागत होता. त्याने संबंधित शेतकर्‍याला दोन धनादेश दिले.
उर्वरित रकमेचे बील डहाट याने आपल्याकडे ठेवले. ३0 जुलै रोजी सदर शेतकर्‍याने डहाट यांना विचारले असता त्यांनी दीड हजार रुपयांची मागणी केली. या संदर्भात शेतकर्‍याने ३ ऑगस्ट रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यावरून सापळा रचून डहाट याला रंगेहात पकडण्यात आले.
या संदर्भात गोंदिया शहर पोलिसात तक्रार करण्यात आली. सदर कारवाई पोलीस निरीक्षक दिलीप वाढणकर, प्रमोद घोंगे, किशोर पर्वते, दिवाकर भदाडे, दीपक दत्ता, राजेश शेंद्रे, योगेश उईके, दिगंबर जाधव, रंजित बिसेन, शेखर खोब्रागडे, अरविंद जाधव, विनोद शिवणकर, पराग राऊत, देवानंद मारबदे, वंदना बिसेन यांनी केली.
भद्रावती (चंद्रपूर) : २0 हजार रूपयाच्या लाच प्रकणात सहभाग असलेल्या एका सहायक पोलीस निरीक्षकास शुक्रवारी अटक करण्यात आली. यापूर्वी भद्रावतीचा ठाणेदार अशोक साखरकर व वाहतूक शाखेचा सहायक पोलीस निरीक्षक शंकर चौधरी यांना १ ऑगस्ट रोजी वर्धा येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या चमूने रंगेहात पकडले होते.
ज्ञानेश्‍वर आव्हाड असे अटक करण्यात आलेल्या सहायक पोलीस निरीक्षकाचे नाव आहे. १ ऑगस्टला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईनंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या चौकशीत फिर्यादीकडून सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्‍वर आव्हाड याने भ्रमणध्वनीवर ठाणेदार साखरकर याला देण्यात येणारी रक्कम ही त्याला न देता मला द्यावी, असे संभाषण केल्याचे निदर्शनास आले. त्याच दिवशी फिर्यादीला आव्हाड याने खरेदी केलेले डायनिंग टेबलचे १८ हजार रुपये संबंधित दुकानदारास देण्यास सांगितले. हे संभाषण ट्रेसिंग झाल्याचे चौकशी दरम्यान समोर आले. त्या आधारावर ७ ऑगस्ट शुक्रवारी दुपारी कलम १५ नुसार कारवाई करुन आव्हाड याला अटक करण्यात आली.
देसाईगंज (गडचिरोली) : जिल्हा परिषद सिंचन उपविभाग कार्यालय देसाईगंज येथील शाखा अभियंता एकनाथ यादव सिडाम (४७) याच्यावर पाच हजार रूपयांची लाच मागितल्याप्रकरणी शुक्रवारी देसाईगंज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
जिल्हा परिषद सिंचन उपविभाग कार्यालय देसाईगंज येथील शाखा अभियंता एकनाथ यादवराव सिडाम याने महात्मा गांधी रोजगार हमी योजनेंतर्गत शेतीकरिता सिंचन विहीर सन २0१५ मध्ये मंजूर झालेल्या शेतकर्‍याला बांधकाम पूर्ण झाल्यानंतर विहिरीचे मोजमाप करून विहिरीचे बिल मंजूर करण्याकरिता पाच हजार रूपयांची मागणी केली होती. तक्रारकर्त्या शेतकर्‍याला या कामासाठी पैसे द्यायचे नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग गडचिरोली यांच्याकडे तक्रार केली. या तक्रारीवरून २४ जुलै २0१५ रोजी सापळा रचून कारवाई करण्यात आली. कारवाईदरम्यान सिडाम याने पाच हजार रूपयांच्या रकमेची मागणी केल्याने त्याच्याविरूद्ध देसाईगंज पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला.