दुग्ध संस्थांची बैठक निष्फळ, दूध बंद आंदोलनाचा इशारा

0
199
gondia

भंडारा,दि.30ः-जिल्ह्यातील प्राथमिक दुग्ध सहकारी संस्थांच्या विविध मागण्या त्वरीत सोडविण्यासाठी मंगळवारी सहकारी संस्था व दुग्ध संघ संचालकांची बैठक आयोजित करण्यात आली होती. परंतु, या बैठकीला दुग्ध संघाच्या अध्यक्षांव्यतिरिक्त कुणीही संचालक उपस्थित नसल्याने बैठक निष्फळ ठरली. मागण्यांबाबत कोणताही तोडगा न निघाल्याने दुग्ध सहकारी संस्थांनी २ ऑक्टोबरपासून जिल्हा दुग्ध संघाला दूध बंद आंदोलन पुकारले आहे.
जिल्ह्यातील दुग्ध सहकारी संस्थांचे दुधाच्या पुरवठय़ापोटी अनेक चुकारे दुग्ध संघाकडे प्रलंबित आहेत. हे चुकारे सुमारे १५ कोटींच्या घरात आहेत. वारंवार पाठपुरावा व विनंती करुनही चुकारे करण्यास विलंब होत असल्याने सहकारी संस्थांचे मोठे नुकसान होत आहे. याउलट दुग्ध संघाचे संचालक आपआपले चुकारे त्वरीत काढून घेऊन अन्य सहकारी संस्थांचे चुकारे प्रलंबित ठेवतात, असा आरोप आहे.
प्रलंबित चुकारे व अन्य मागण्यांसाठी मंगळवारी जिल्हा दुग्ध संघाच्या कार्यालयात सहकारी संस्था पदाधिकारी व दुग्ध संघ संचालकांची बैठक बोलविण्यात आली होती. तशी नोटीसही सर्व संचालकांना दिली होती. परंतु, अध्यक्षांव्यतिरिक्त सर्व संचालकांनी बैठकीला दांडी मारली. दुग्ध संघाच्या अध्यक्षांनी मागण्यांच्या निवेदनावर एक महिन्याची मुदत मागितली. परंतु, सहकारी संस्था आपल्या मागण्यांवर ठाम असून मागण्यांची दखल घेत नसल्याने जिल्हा दुग्ध संघाला २ ऑक्टोबरपासून दूध पुरवठा बंद आंदोलन करणार आहेत.