तुमसर-तिरोडी रेल्वे मार्गाच्या विद्युतीकरणाला वेग

0
175

तुमसर-तुमसर रोड ते तिरोडी या ब्रिटिशकालीन रेल्वे मार्गाचे भाग्य उजाळणार असून, या मार्गावर विद्युतीकरणाला वेग आला आहे. २0२१ पर्यंत या मार्गाचे विद्युतीकरण पूर्ण होणार आहे. मध्य भारताला जोडणारा हा महत्त्वपूर्ण रेल्वे मार्ग आहे.
सातपुडा पर्वतरांगात ब्रिटिशांनी मॅग्निज वाहतुकीसाठी महाराष्ट्रातील तुमसर ते मध्यप्रदेशातील तिरोडीदरम्यान ४२ किलोमीटरचा रेल्वे मार्ग तयार केला होता. १९२८ मध्ये या मार्गाचे काम पूर्णत्वास आले होते. तिरोडी-कटंगी या १२ किमी रेल्वेमार्गाचे काम सध्या प्रगतीपथावर आहे. मध्यप्रदेशातील तिरोडी हे सध्या शेवटचे रेल्वेस्थानक आहे. तुमसर-तिरोडी-कटंगी आणि बालाघाट असा हा रेल्वेमार्ग अस्तित्वात येत आहे. पुढे जबलपूर मध्यप्रदेशात जाणारा हा वेळेची बचत करणारा मार्ग ठरणार आहे. यापूर्वी कोळसा व त्यानंतर डिझल इंजीनवर रेल्वे धावत आहे. पुढील काळात विजेवर येथे रेल्वे धावणार आहे.
ब्रिटीशांनी चिखला, डोंगरी व मध्यप्रदेशातील तिरोडी खाणीचा शोध लावला. मॅग्निजची उचल करून वाहतुकीसाठी या मार्गावर रेल्वे ट्रॅक तयार केले. काही ठिकाणी दगड फोडून रेल्वे मार्ग तयार करण्यात आला आहे. या मार्गावर आठ लहान मोठे रेल्वे स्थानक आहेत. त्यात तुमसर टाऊन, गोबरवाही, डोंगरी, तिरोडी हे प्रमुख मोठे स्थानक आहेत. परंतु काही रेल्वे स्थानक वगळता इतर ठिकाणी मूलभूत सुविधांचा अभाव आहे. दिवसातून चार वेळा प्रवासी रेल्वेगाडी या मार्गावर धावते.