कोरोना लस : मेडिकलमध्ये तिसर्‍या टप्प्यातील चाचणीला सुरुवात

0
410

नागपूर,दि.24ः कोरोनावरील प्रतिबंधक ‘कोविशिल्ड’ लसीच्या तिसर्‍या टप्प्यातील चाचणीला मेडिकल येथे शुक्रवारपासून सुरुवात झाली असून, येत्या दोन दिवसांच्या कालावधीत ५0 व्यक्तींना लस दिली जाणार आहे. यात २0 महिला, ६0 वर्षांवरील पाच ज्येष्ठ नागरिक तर १८ ते ५५ वयोगटातील २५ पुरुषांचा समावेश आहे.
‘ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी’, अँस्टॅजेनका कंपनीकडून ‘कोविशिल्ड’ लसीच्या मानवी चाचणीसाठी मागील महिन्यात नागपूर मेडिकलला परवानगी मिळाली आहे. त्या अनुषंगाने मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा यांच्या नेतृत्वात पल्मनरी मेडिसीनचे विभाग प्रमुख, कोविड हॉस्पिटल आयसीयूचे इन्चार्ज व चाचणीचे प्रमुख अन्वेषक डॉ. सुशांत मेश्राम यांच्या मार्गदर्शनात ही चाचणी होत आहे. चाचणीकरिता १८ ते ७0 वयोगटातील निरोगी व्यक्तीची निवड करून त्यांची कोविड व रक्ताची तपासणी करण्यात आली. यात सामान्य अहवाल आलेल्या ५0 लोकांची निवड करून आजपासून पहिला डोज देणे सुरू झाले आहे. दरम्यान, पहिला डोज दिल्यानंतर २८ दिवसांनी २0 नोव्हेंबर रोजी दुसरा डोज दिला जाणार आहे. ५६ व्या दिवशी रक्ताची तपासणी करण्यात येईल. ९0 व्या दिवशी प्रकृती विषयी चौकशी केली जाईल व १८0 व्या दिवशी पुन्हा रक्ताची तपासणी केली जाणार आहे. शुक्रवारपासून ‘कोविशिल्ड’चा पहिला डोज देण्यास सुरुवात झाली आहे. पुढील दोन दिवसात ५0 व्यक्तींना हा डोज दिला जाईल. लस देण्यात येणार्‍या स्वयंसेवकाच्या प्रकृतीवर डॉक्टरांची चमू लक्ष ठेवून असणार असल्याची ‘कोविशिल्ड’ चाचणी माहिती प्रमुख अन्वेषक डॉ. सुशांत मेश्राम यांनी दिली.