गोंदिया शहरात येणाऱ्या अवजड वाहनासंबंधी आक्षेप मागविले

0
532

गोंदिया,दि.24 : गोंदिया शहरामध्ये मागील काही वर्षात दुचाकी व चारचाकी वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढलेली आहे. त्यामुळे संपूर्ण शहरात वाहनांची कायम वर्दळ असते. परंतू शहरातील रस्त्यांची रुंदी ही त्याप्रमाणात वाढलेली नसल्याने वाहतुकीच्या कोंडीस आपणा सर्वांना सामोरे जावे लागत आहे. त्यातही शहराच्या मुख्य बाजारपेठेमध्ये रस्ते अरुंद असल्याने व मुख्य बाजारपेठेत व्यापाऱ्यांचा माल घेवून येणारी जड अवजड वाहने ही संपूर्ण दिवसभर येत असल्याने वाहतुकीची कोंडी होते व सर्वांची गैरसोय होते.

गोंदिया शहरातील वाहतूक सुरळीत व सुरक्षीत राहण्याच्या दृष्टीने तसेच सामान्य जनतेला धोका, गैरसोय, अडथळा निर्माण होवू नये यादृष्टीने महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 33 (1) (ब) नुसार शहरामध्ये प्रवेश करणाऱ्या जड व अवजड वाहनांना सकाळी 9 ते रात्री 9 वाजतापर्यंत पुढील नमूद करण्यात आलेल्या मार्गावरुन व इतर तत्सम मार्गावरुन गोंदिया शहरात प्रवेश बंदी करण्याबाबत प्रशासन गांभीर्याने विचार करीत आहे. त्यादृष्टीने 27 ऑक्टोबर ते 2 नोव्हेंबर 2020 या कालावधीत सदरची बंदी ही प्रायोगिक तत्वावर राबविण्यात येणार आहे. त्यानंतर कायमस्वरुपी अधिसूचना लागू करण्यात येईल. तरी या कालावधीत या संदर्भात कोणत्याही नागरिकास सदर बंदीबाबत सूचना किंवा आक्षेप नोंदवायचे असल्यास जिल्हा वाहतूक शाखा, मनोहर चौक गोंदिया किंवा पोलीस नियंत्रण कक्ष गोंदिया येथे लेखी स्वरुपात नोंदवावी.

       कारंजा टी-पाईंटकडून गोंदिया शहराकडे येणारा मुख्य रस्ता, पतंगा चौक ते फुलचूर/गोंदिया शहराकडे येणारा मुख्य रस्ता, राजाभोज चौक ते छोटा गोंदिया मार्गे गोंदिया शहराकडे येणारा मुख्य रस्ता, मरारटोली जंक्शनकडून गोंदिया शहराकडे येणारा मुख्य रस्ता, राणी अवंतीबाई चौक ते छोटा पॉल चौककडे येणारा मुख्य रस्ता, कुडवा नाका ते पॉल चौककडे येणारा मुख्य रस्ता, सिंधी शाळा ते गोंदिया शहराकडे येणारा मुख्य रस्ता. सदर अधिसूचना 27 ऑक्टोबरच्या सकाळी 9 वाजतापासून ते   2 नोव्हेंबरच्या रात्री 9 वाजतापर्यंत अंमलात राहील.  असे पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांनी कळविले आहे.