गोरेगाव – तालुक्यातील अनेक शेतकर्यांच्या शेतातील धान पीक मावा तुडतुडा रोगाने पूर्णता नष्ट झाले आहेत. त्यामुळे अशा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना त्वरित आर्थिक मदत करा तसेच तात्काळ धान खरेदी केंद्र सुरू करा अशी मागणी गोरेगाव पंचायत समितीच्या माजी सभापती चित्रकला चौधरी यांनी आज 29 ऑक्टोबर तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
यावर्षी परतीच्या पावसाने शेतकर्यांच्या शेतातील पिकांची नासाडी झाली आहे. शेतकरी या संकटातून बाहेर पडत नाही तोच पुन्हा या पिकांवर रोगाने आक्रमण केले. मावा तुडतुडा या रोगाने शेतकर्यांच्या शेतातील उभे धान पीक पूर्णता नष्ट झाले. त्यामुळे शेतकर्यांच्या जनावरांचा चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे शासनाने तातडीने या नुकसान ग्रस्त शेतकर्यांना नुकसानभरपाई म्हणुन आर्थिक मदत करावी, अशी मागणी गोरेगाव पंचायत समितीच्या माजी सभापती चित्रकला चौधरी यांनी केली आहे. त्याचप्रमाणे तालुक्यातील शेतकर्यांच्या शेतातील हलक्या प्रतीच्या धानाची कापणी व मळणी जोरात सुरू आहे. मात्र अद्याप ही धान खरेदी साठी हमी भाव केंद्र सुरू झाले नाही. त्यामुळे ऐन सणासुदीच्या दिवसात शेतकर्यांना आर्थिक फटका बसला आहे. त्यामुळे त्यांची दिवाळी अंधारातच जाणार आहे. मागील चार महिन्यांपासून संजय गांधी निराधार योजना तसेच श्रावण बाळ योजनेच्या लाभार्थ्यांना अनुदान मिळाले नाही. त्यामुळे त्यांची ही दिवाळी अंधारात जाणार असल्याने त्वरित मदत करावी अशी मागणी चित्रकला चौधरी यांनी निवेदनातून केली आहे. निवेदन देतेवेळी माजी पंचायत समिती सदस्य पुष्पराज जणबंधू, भाजयुमोचे तालुकाध्यक्ष विनोद पटले, माजी सरपंच रमेश ठाकूर, नंदू तुप्पट आदी उपस्थित होते.