इस्रायली आंबा लागवड एक नाविन्यपूर्ण प्रयोग

0
217

गोंदिया : पारंपारिक पीकपद्धती पाहिजे तशी लाभदायक नाही हे आता शेतकऱ्यांना कळू लागलं आहे. जुने-जाणती वयस्क मंडळी अजूनही असे बदल स्वीकारायला सहसा तयार होत नाही. मात्र वर्तमान पिढीतील तरुण शेतकरी नावीन्यपूर्ण प्रयोग करण्याचा प्रयत्न करतात ही शेतकऱ्यांच्या भरभराटीसाठी जमेची बाजू आहे. धाबेटेकडी आदर्शच्या ललित सोनवाने या तरुण शेतकऱ्याने आपल्या शेतात चक्क इस्रायली आंब्याची लागवड केली.तो एवढ्यावरच थांबला नाही तर त्याने केवळ आंब्याच्या शेतीवरच अवलंबून न राहता आंब्याच्या झाडाखाली अद्रक या आंतरपीकाची लागवड केली. याच शेतात मधमाशी पालनही सुरू केले आहे. त्याच्या या अभिनव उपक्रमाची नाबार्डचे जिल्हा सरव्यवस्थापक जागरे, माजी जि .प सदस्य गंगाधर परशुरामकर, किशोर तरोणे,सारडा संस्थेचे गजानन अलोणे, सरपंच दीपक सोनवाने यांनी भेट देऊन मुक्तकंठाने प्रसंशा केली आहे. सोनवाने हे कृषी विभागातर्फे अभ्यास दौऱ्यावर गेले असताना त्यांना इस्रायली आंबा लागवडीची प्रेरणा पिंपरी चिंचवडचे जनार्दन वाघेरे यांचेकडून मिळाली.त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपणही आंब्याची बाग लावावी हे त्यांचे स्वप्न होते. त्यांनी लाखांदूरच्या येरणे रोपवाटिकेतून ८०० इस्रायली आंब्याची झाडे खरेदी केली.जुलै २०१९ मध्ये त्यांनी पाऊण एकरात लागवड केली. यात दशहरी,केशर जातीचे आंबे आहेत.आजघडीला केवळ १६ महिन्यात झाडांची उंची सुमारे ७ ते ८ फूट आहे. त्यांनी या बागेत केवळ जैविक पद्धतीच्या खताचा अवलंब केला. या आंब्याला २७ महिन्यात बहर येईल व साधारणतः ३२ महिन्यात फळ येईल असे त्यांनी सांगितले.आंबा लागवडीतून पहिल्याच वर्षाला दोन ते अडीच लक्ष रुपयांचे उत्पादन होईल असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. सुमारे ७ ते ८ वर्षांपासून त्यांच्याकडे ठिबक सिंचन योजनेची व्यवस्था आहे.त्यामुळे पाण्याची बचत व झाडांना खत देणे सोयीस्कर होते.विशेष म्हणजे मनुष्यबळाचा अगदी कमी वापर होतो. केवळ आंब्याच्या बागेवरच ते समाधानी नाहीत. म्हणून त्यांनी आंब्याच्या झाडाखाली अद्रक हे आंतरपीक म्हणून लागवड केली. त्यांनी ५ क्विंटल अद्रकाची लागवड केली.यापासून त्यांना ५०-५५ क्विंटल उत्पादन अपेक्षित आहे.
४००० रुपये प्रति क्विंटल जरी भाव मिळाला तरी सुमारे दोन लक्ष रुपये उत्पन्न येईल. यात शुद्ध नफा हा एक ते सव्वा लक्ष रुपये असेल असे त्यांनी सांगितले. जुलै २०१९ मध्येच त्यांनी या जागेत मधमाशी पालन सुरू केले.पण दुर्दैवाने यावर्षी मधमाशा अचानक नाहीशा झाल्या.हा प्रयोग कुठेतरी फसल्याची खंत त्यांना आहे. मात्र यामुळे नाउमेद न होता आपण आणखी सुरू करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
आंबाबागेत मधमाशा अधिक उपयुक्त ठरतील या दिशेने मी प्रयत्न करणार असल्याचे ते म्हणाले. त्यांनी या शेतात रासायनिक खताचा वापर टाळला.जैविक व सेंद्रिय खतांचा वापर केला. शेतातच खत निर्मिती त्यांनी सुरू केली.त्यांचा हा प्रयोग सुध्दा वाखाणण्याजोगा आहे.