चंद्रपूर,दि.2 : जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा बळकट करण्यासाठी विविध निधीतून तब्बल 85 कोटी वापरुन जिल्ह्यातील आरोग्य सेवा बळकट करण्यात येत आहे. जिल्ह्यात चालू वर्षात आतापर्यंत पाच प्राथमिक आरोग्य केंद्रांना मंजुरी देण्यात आली असून पुढील दोन वर्षात जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र नवीन इमारतीत सुसज्ज व्यवस्थेसह कार्यान्वित होतील, यादृष्टीने नियोजन करण्यात आले असल्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी आज सांगितले.
सावली तालुक्यातील व्याहाड आरोग्यवर्धिनी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नवीन इमारतीचे भूमिपूजन आज राज्याचे मदत व पुनर्वसनमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षा म्हणून जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या गुरनुले उपस्थित होत्या. तर जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्ष व आरोग्य व शिक्षण विभागाच्या सभापती रेखा कारेकार, सभापती विजय कोरेवार आदी उपस्थित होते.
पालकमंत्री म्हणाले, कोरोनावर मात करण्यासाठी जिल्ह्यातील नागरिकांकरिता कठीण प्रसंगी सुविधा उपलब्ध व्हावी म्हणून 38 रुग्णवाहिका घेण्यात आल्यात. सोबतच विविध विकास कामांनादेखील मंजुरी देण्यात येत आहे. वर्षातून दोन वेळा पीक घेता यावे म्हणून सिंचनामध्ये जिल्हा स्वयंपूर्ण करण्याच्या दृष्टीने नियोजन करण्यात येत आहे. व्याहाड गावातील सार्वजनिक सभागृहासाठी 30 लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला असून काम सुरू झाल्यावर अधिक निधी देणार असल्याचेही त्यांनी सांगितले. एकोरी माता देवीच्या तीर्थक्षेत्र विकास कामांसाठी एक कोटी रुपये मंजूर करण्यात येतील. धान उत्पादक शेतकऱ्यांना मागील वर्षीप्रमाणे यावर्षी 700 रुपये बोनस देण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे. शेतकरी सुखी व्हावा म्हणून या क्षेत्रात विकास कामांसाठी मोठ्या प्रमाणात भर देण्यात येणार आहे. पालकमंत्र्यांनी यावेळी निलसनी पेठगाव येथील समाज भवनाचे देखील लोकार्पण केले.
कोरोना अजून संपला नाही, पण थोडासा कमी झाला आहे. तुम्ही काळजी घेतली नाही तर तो पुन्हा वाढणार आहे. आपल्याकडेदेखील कोरोनाची वाढ थांबून त्यावर नियंत्रण मिळाले आहे. दिवाळीत खरेदीसाठी बाजारात जाताना दक्षता घ्यावी. माझे कुटुंब माझी जबाबदारी ही भूमिका निभावून कोरोनापासून सर्व कुटुंबियांना वाचवावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या गुरनुले यांनी आरोग्य ही प्रत्येक नागरिकाची संपत्ती असून त्याची काळजी घेणे प्रत्येकाचे कर्तव्य असल्याचे सांगितले. यावेळी त्यांनी एकोरी माता देवस्थान दुरुस्ती तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांकरिता निवासस्थानाचे बांधकाम करून देण्याची मागणी पालकमंत्र्यांकडे केली.
यावेळी बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अविनाश बांगडे यांनी नवीन आरोग्य केंद्राच्या बांधकामासाठी 3 कोटी 99 लाख रुपये मंजुरी मिळाली होती, असे सांगून केवळ 9 महिन्यात आरोग्य केंद्राचे बांधकाम पूर्ण केले असल्याचे सांगितले. या इमारतीत पुरुष व स्त्रियांसाठी वेगवेगळे तपासणी कक्ष, ऑपरेशन थिएटर, शवविच्छेदन गृह, इत्यादी अद्यावत सोई सुविधा उपलब्ध असल्याचे सांगण्यात आले