‘रोहयो’ अंतर्गत फळबाग योजनेचे उद्दिष्ट तातडीने पूर्ण करा- जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस

कृषि विभागाच्या विविध योजना, ‘आत्मा’ची आढावा बैठक ;; एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रमातील कामांना गती द्यावी ;;; ‘आत्मा’च्या माध्यमातून शेतकरी गट निर्मितीसाठी सूक्ष्म नियोजन करा

0
1301

वाशिम, दि. ०३ : जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीसाठी फळबाग लागवडीला चालना देण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत सन २०२०-२१ मध्ये १७२० हेक्टर फळबाग लागवडीचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. हे उद्दिष्ट लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी सर्व तालुका कृषि अधिकारी यांना दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वाकाटक सभागृहात आज, ३ नोव्हेंबर रोजी आयोजित कृषि विभागाच्या विविध योजना तसेच ‘आत्मा’ नियामक मंडळाच्या आढावा सभेत ते बोलत होते.

यावेळी जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी शंकर तोटावार, जिल्हा कृषि विकास अधिकारी श्री. बन्सोड, पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. बी. एस. बोरकर, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. विनोद वानखेडे, ‘नाबार्ड’चे जिल्हा व्यवस्थापक विजय खंडरे, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक दत्तात्रय निनावकर, प्रभारी जिल्हा समाज कल्याण अधिकारी अंबादास मानकर यांच्यासह संबंधित विभागांचे शासकीय अधिकारी, अशासकीय सदस्य, सर्व तालुका कृषि अधिकारी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. म्हणाले, इतर पिकांच्या तुलनेत फळबाग लागवडीतून शेतकऱ्यांना अधिक उत्पन्न मिळते. त्यामुळे सिंचनाची सुविधा असलेल्या शेतकऱ्यांनी आपल्याकडील काही क्षेत्रात फळबाग लागवड करावी, यासाठी, कृषि विभागाने विशेष प्रयत्न करणे आवश्यक आहे. प्रत्येक कृषि सहाय्यकाने त्यांच्या कार्यक्षेत्रात किमान १० हेक्टर क्षेत्रावर फळबाग लागवड करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले असून ते पूर्ण होईल, यासाठी प्रयत्न करावेत. जिल्हा परिषदेच्या कृषि विभागामार्फत अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीच्या शेतकऱ्यांना सिंचन विहिरींचा लाभ देण्यात आला असून त्यांना बारमाही सिंचनाची सुविधा उपलब्ध झाली आहे. या शेतकऱ्यांना फळबाग लागवडीसाठी प्रोत्साहित करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या. तसेच एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रमांतर्गत मंजूर निधीतील सर्व कामे मार्च अखेरपर्यंत पूर्ण होणे आवश्यक आहे. त्यामुळे ही कामे पूर्ण होण्यासाठी सूक्ष्म नियोजन करावे, असे त्यांनी सांगितले.

शेतकरी गट निर्मितीस चालना द्यावी; सेंद्रिय शेतीसाठी प्रोत्साहित करा

‘आत्मा’च्या माध्यमातून शेतकरी गट निर्मितीला प्रोत्साहन देणे आवश्यक आहे. शेतकरी गटाच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी एकत्रित येवून शेतीसाठी लागणारी यंत्र सामग्री, बियाणे, खते एकत्रित येवून खरेदी केल्यास त्यांच्या उत्पादन खर्चात बचत होण्यास मदत होते. त्यामुळे जिल्ह्यातील प्रत्येक शेतकरी हा कोणत्याही एका शेतकरी गटाचा सदस्य असावा, यादृष्टीने नियोजन करून शेतकरी गट निर्मितीस चालना द्यावी, अशा सूचनाही जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी दिल्या. तसेच जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सेंद्रिय शेती करण्यासाठी प्रोत्साहित करावे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी यावेळी राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजना-कडधान्य, राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजना- पौष्टिक तृणधान्य, एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान, राष्ट्रीय शाश्वत शेती अभियान अंतर्गत वनशेती उपअभियान, जमीन आरोग्य पत्रिका योजना, कोरडवाहू क्षेत्र विकास योजना, एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रम, प्रधानमंत्री पीक विमा योजना, शेतकरी अपघात विमा योजनेचा आढावाही घेतला.