जिल्ह्यात पणन कडून धान खरेदी सुरु

0
416

गोंदिया,दि.5= आधारभुत किंमत धान खरेदी योजना हंगाम 2020-21 नुसार जिल्ह्यातील कटंगीकला, रतनारा, गिरोला, अदासी, काटी, दासगाव, टेमनी, गोंदिया, खातीया (परसवाडा), मुंडीपार (MIDC), आसोली, कोचेवाही, रावणवाडी, कामठा, नवेगाव/धापेवाडा, मजितपूर, गोरेगाव, कालीमाटी (गोरेगाव), तिमेझरी, गणखैरा, तेढा, मोहगाव तिल्ली, चोपा, कुऱ्हाडी, कवलेवाडा, दवडीपार, गोंदेखारी, सर्वाटोला, वडेगाव, बघोली, भिवापूर, तिरोडा, ठाणेगाव, मेंढा, मुंडीकोटा, चिखली, खैरबोडी, चुरडी, परसवाडा, नवेझरी, चिरेखनी, पांजरा, विहिरगाव, आमगाव, कालीमाटी (आमगाव), गोरठा, कट्टीपार, तिगाव, अंजोरा, वळद, सुपलीपार, सालेकसा, कोटजांभोरा, सौंदड, बाम्हणी, हेटी, मुरपार, धानोरी, पांढरी, हरदोली, अर्जुनी/मोरगाव (वि.का.), अर्जुनी/मोरगाव (रा.मि.) अर्जुनी/मोरगाव (ख.वि.), नवेगावबांध, महागाव, बोंडगाव देवी, वडेगाव स्टेशन, बाकटी, धाबेटेकडी, भिवखिडकी या 70 धान खरेदी केंद्र सुरु करण्यासाठी जिल्हाधिकारी गोंदिया यांनी मंजूरी दिली आहे.

जिल्हा पणन अधिकारी गोंदिया या कार्यालयाकडून जिल्ह्यातील विविध सहकारी संस्थांना पाच दिवसाच्या आत धान खरेदी केंद्र सुरु करण्यासाठी निर्देश दिले असून शेतकऱ्यांकरीता पुढीलप्रमाणे मार्गदर्शक सूचना निर्गमीत केलेल्या आहेत. धान खरेदी केंद्रावर धान खरेदी करतांना सदर केंद्रास जोडलेल्या गावाच्या यादीनुसारच धानाची खरेदी करावी. धान खरेदी करतेवेळी शेतकऱ्यांनी त्या हंगामाचा पिकपेरा असलेल्या सातबाराचा उतारा मुळप्रत (डिजीटल स्वाक्षरीचे व त्यावर धानाखाली लागवड क्षेत्रफळ नमूद आहे असा), आधारकार्ड झेरॉक्स व बँक खाते पासबुक झेरॉक्स घेवून धान खरेदी केंद्रावर आणावे. शेतकऱ्यांनी आपले बँक खाते नोंदवितांना आधारलिंक असलेले, KYC पूर्ण झाले असलेले, खात्यामध्ये देवाण-घेवाण सुरु असलेले बँकेचे खाते नंबर दयावे. शेतकऱ्यांनी धानाचे वजनकाटे करतेवेळेस स्वत: ओळखपत्र घेवून हजर रहावे. धान मोजल्यानंतर वजन पोचपावती प्राप्त करुन घ्यावी. FAQ दर्जाचे धान खरेदी केल्या जाईल. त्यामुळे शेतकऱ्यांनी धान चाळणी करुन, साफसफाई करुन तसेच वाळलेले धान केंद्रावर विक्रीस आणावा. शेतकऱ्यांनी धान चांगले भरलेले, विक्रीस योग्य, सुकलेले/कोरडे स्वच्छ व अन्न म्हणून खाण्यास उपयुक्त असेल, समान सारख्या रंगाचे व समान आकाराचे असे धान खरेदी केले जाईल. तसेच खरेदी केलेले धान हे बुरशी, कीड व अनिष्ठ स्वरुपाचा गंध विरहीत असावे. केंद्रावर येणारा धान अपाय हानिकारक वस्तुचे, पदार्थाचे मिश्रण भेसळ असणार नाही याची दक्षता घ्यावी. केंद्राला जोडलेले गाव आपल्या तालुक्यातील कृषि उत्पन्न बाजार समितीमध्ये टोकण घेतेवेळी बघण्यास उपलब्ध होईल. शेतकऱ्यांनी धान विक्री केंद्रावर धानाचे मोजमाप करतेवेळी धान साठा प्रती गोणीमध्ये 40 किलो व बारदान्याचे वजन 0.580 ग्रॅम असे एकूण 40.580 किलोचे आपले समक्ष मोजमाप करण्यात यावे. संस्था/ग्रेडर जास्त धान घेत असल्यास त्याची तक्रार जिल्हा पुरवठा अधिकारी, तहसिलदार व जिल्हा पणन अधिकारी गोंदिया यांचेकडे करण्यात यावी. शेतकऱ्यांनी आपला धान नंबर प्रमाणे विक्रीस आणावा. त्यासाठी प्रथम केंद्रावर आपले नाव/मोबाईल नंबर/अंदाजे वजन यांची नोंद करावी. शेतकऱ्यांचे सीमांत, लघु, मध्यम, मोठे शेतकरी अशी जमिनीधारनेवर आधारीत तसेच अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर व अवर्गीकृत अशी वर्गवारी करण्यासाठी शेतकऱ्यांकडून त्यांच्या जमिनीचा नमूना 8 (अ) तसेच जातीबाबतचे स्वघोषित प्रमाणपत्र घेण्यात यावे.

हंगाम 2020-21 करीता शासनाने आधारभुत दर ‘अ’ प्रत धानासाठी प्रती क्विंटल रुपये 1888/- व ‘साधारण’ प्रत धानासाठी प्रती क्विंटल रुपये 1868/- हे दर निश्चित केले असून धान खरेदीचा कालावधी 1 ऑक्टोबर 2020 ते 31 मार्च 2021 पर्यंत आहे. तरी जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांनी या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे जिल्हा पणन अधिकारी गोंदिया यांनी कळविले आहे.