राष्ट्रसंतांच्या पुण्यतिथी निमित्य कावली गावात “फिरते मुक्त वाचनालय”

0
244

अंजनसिंगी:- वं.राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज 52 वाँ पुण्यतिथी महोत्सवानिमित्य श्रीगुरुदेव सेवा मंडळ कावली येथिल युवा कार्यकर्ता ग्रामगीताचार्य निलेश मोहकार यांच्या पुढाकाराने कावली गावातील विद्यार्थ्यांसाठी “फिरते मुक्त वाचनालय” सुरू करण्यात आले आहे.
राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांचे साहित्य, संतांची चरित्रे, समाजसुधारक,श्रेष्ठ स्त्रिया, स्वामी विवेकानंद जीवन चरित्र, श्यामची आई इत्यादी साहित्य फिरते वाचनालयाच्या माध्यमातुन सामाजिक अंतर ठेऊन विद्यार्थ्यांच्या घरा-घरा पर्यंत जाऊन निलेश मोहकार देत आहे. या उपक्रमातून विद्यार्थ्यांच्या बाल मनावर संस्कार टाकण्याचा प्रयत्न व शाळा बंद काळात विद्यार्थ्यांना अवांतर वाचनाची गोडी कायम टिकून राहावी, थोर समाजसुधारक यांचे कार्य हे विद्यार्थ्यांना माहिती व्हावे,या पुण्यतिथी काळात राष्ट्रसंतांच्या विचारांचा जागर व्हावा हाच या मागचा उदात्त हेतु. वंदनिय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांच्या ग्रामगीतेतील उक्तीनुसार ” काही पठण-पाठण करावे। शरीर मनासि वळण लावावे। आयुष्य सुंदर होते आघवे। ऐशा क्रमे।। अशाप्रकारे ग्रामगितोक्त संस्कार बालमनावर रुजविण्याचा हा एक मानस आहे.
यासाठी निलेश मोहकार हे आपल्या सायकलवर एका खोक्यात संत साहित्य व समाजसुधारक यांची पुस्तके ठेऊन गावात विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन मुलांना वाचनासाठी सुंदर पुस्तके देतात. पुस्तकांच्या जावकची नोंद आपल्या वहीत करतात.मुलांना नवीन नवीन पुस्तके वाचायला मिळत असल्यामुळे मुले आनंदित आहे. या उपक्रमाने कावली वासीयांचे लक्ष वेधले आहे.
गावातील अखिल भारतीय श्रीगुरुदेव सेवा मंडळाचे आजीवन प्रचारक श्री रमेशराव ठाकरे गुरुजी,ला.मु.राठी विद्यामंदीर कावली चे मुख्याध्यापक सिद्धार्थ हेंवडे, पोलीस पाटील अतुल परतेकी,जि.प.प्राथमिक मराठी शाळा, व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रदीप जोगे यांनी या उपक्रमाचे कौतुक केले आहे.या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी निलेश मोहकार,क्रिश जोगे,पियुष झाडे,तन्मय झाडे,पुजा काळे,विशाखा उईके,सुहाना भोंगाडे यांनी अथक परिश्रम केले आहे.निलेश मोहकार यांचा “फिरते मुक्त वाचनालय” हा अभिनव उपक्रम गावासाठी प्रेरणादायी ठरला आहे.