देवरी=स्वच्छ भारत मिशन अंतर्गत नगर पंचायत देवरीच्या वतीने शहर वासीयांसह शहरात येणार्या नागरिकांची गैरसोय होवू नये, यासाठी चौकाचौकात सार्वजनिक शौचालयांची निर्मिती केली. मात्र, या शौचालयांच्या देखभाल दुरूस्तीकडे नगर पंचायतीचे दुर्लक्ष झाल्याने हे शौचालय आजघडीला आजार पसरविण्याचे केंद्र ठरू लागले आहेत. पुर्वीच कोरोनाचा उद्रेक सुरू असताना या शौचालयाच्या दुरवस्थेमुळे त्यात अधिकची भर पडली असल्याने शहरवासीयांमध्ये नगर पंचायतीच्या कारभाराला घेवून असंतोष पसरत आहे.
देवरी शहरातील मुख्य असलेल्या चिचगड रोडवरील रानी दुर्गावती चौक परीसर, बाजार चौक परीसर,न्यायालय परीसर, बौद्धविहार परीसर, नगरपंचायत परीसर, पटाची दान परीसर, केशोरी तलाव परीसर अशा ठिकाणी लाखो रुपए खर्च करुन देवरी नगरपंचायतच्या वतीने शौचालय उभारण्यात आले. तर काही ठिकाणी डिजिटल पद्धतीने टिनाच्या पत्र्यांचे शौचालय तयार करण्यात आले. परंतु, या शौचालयाकडे योग्य त्या देखरेख व दुरूस्तीअभावी शौचालयांची दुरवस्था झाली आहे. अनेक शौचालयात दुगंर्धी पसलेली आहे. तर टिनाच्या पत्र्यांनी तयार करण्यात आलेल्या शौचालयांचे दरवाजे चोरीला गेल्याचेही चित्र शहरात दिसून येत आहे. या संदर्भात परिसरातील नागरिकांनी अनेकदा नगर पंचायतच्या पदाधिकारी व अधिकार्यांना तक्रार करून माहिती दिली. दरम्यान नगर पंचायतीतर्फे अज्ञात आरोपीविरोधात देवरी पोलिस स्टेशनमध्ये तक्रार केल्याची माहिती अधिकारी, पदाधिकारी नागरिकांना देत असत. तसेच शौचालयांची थातूरमातूर स्वच्छता करून वार्यावर सोडण्यात आले. परंतु, सद्यस्थितीत शौचालयांची दुरवस्था झाली असून शौचालय परिसरात दुगंर्धीचे वातावरण निर्माण झाले आहे. यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे कोरोना संसर्गाच्या उद्रेक असताना नविन समस्या देवरी नगरात निर्माण झाल्याने नागरिक नगर पंचायतीच्या कारभारावर संताप व्यक्त करीत आहेत. नगर पंचायत प्रशासनातील अधिकारी, पदाधिकार्यांनी याकडे लक्ष केंद्रीत करून समस्या मार्गी लावावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून करण्यात आली आहे.