जिल्ह्यात सिनेमाहॉल, इनडोअर खेळांना परवानगी

0
541

वाशिम, दि. ०७  : कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक उपाययोजनेअंतर्गत जिल्ह्यात ३० नोव्हेंबर २०२० पर्यंत लॉकडाऊनचे आदेश लागू आहेत. शासनाच्या ३ नोव्हेंबर २०२० च्या आदेशानुसार लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल करून शिक्षणासाठी स्विमिंग पूल, योगा इन्स्टिट्यूट, सर्व प्रकारचे इनडोअर खेळ व ५० टक्के क्षमतेसह सिनेमाहॉल सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे. याबाबतचे आदेश जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी ५ नोव्हेंबर रोजी निर्गमित केले आहेत.

राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडूंसाठी प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील स्विमिंग पूल शिक्षणासाठी सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे. तसेच प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील योगा इन्स्टिट्यूट सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे. मास्क, सोशल डिस्टसिंग व सॅनिटायझरचा वापर इत्यादी नियमांचे पालन करून बॅडमिंटन, टेनिस, स्क्वॅश, इनडोअर शुटींग रेंजेस इत्यादी सारख्या सर्व प्रकारच्या इनडोअर खेळांना परवानगी देण्यात आली आहे. प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील सिनेमाहॉल, थियटर्स, मल्टीप्लेक्स, ड्रामा थियटर्स ५० टक्के क्षमतेसह सुरु राहतील. सिनेमाहॉल, थियटर्स, मल्टीप्लेक्स, ड्रामा थियटर्समध्ये खाद्य पदार्थ आणण्यास किंवा तेथे पुरविण्यास परवानगी असणार नाही.

शासनाच्या क्रीडा विभाग, आरोग्य विभाग, सांस्कृतिक कार्य विभाग यांचेकडून तसेच केंद्र शासनाच्या विविध विभागांकडून यापुढे सदरबाबत प्राप्त होणाऱ्या नियमावलींचे पालन करणे बंधनकारक राहील. कोरोना विषाणूच्या अनुषंगाने प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्याबाबत महाराष्ट्र शासनाकडून वेळोवेळी निर्गमित करण्यात आलेले आदेश, निर्देश, नियमावली (एसओपी) नुसार जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण तथा जिल्हाधिकारी कार्यालयाकडून वेळोवेळी निर्गमित केलेले आदेश लागू राहतील, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

या आदेशाची अंमलबजावणी करण्यास टाळाटाळ केल्यास अथवा विरोध दर्शविल्यास संबंधितांविरुद्ध आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ चे कलम ५१ ते ६०,  भारतीय दंड संहीता १८६० चे कलम १८८ अन्वये कारवाई करण्यात येईल, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी निर्गमित केलेल्या आदेशात म्हटले आहे.