भंडारा दि. 11: कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर भविष्यात उद्भवणाऱ्या आरोग्याच्या समस्या तातडीने सोडविण्यासाठी व नागरिकांना उत्तम आरोग्य सेवा पुरविण्यासाठी आरोग्य सुविधांचे बळकटीकरण आवश्यक असून अद्यावत सेवा देण्यावर लक्ष केंद्रित करा असे निर्देश जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी आरोग्य विभागाला दिले. जिल्हाधिकारी कार्यालयाचे सभागृहात आरोग्य विभागाची आढावा बैठक घेण्यात आली त्यावेळी ते बोलत होते.
मुख्य कार्यकारी अधिकारी विनयकुमार मून, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सचिन पानझाडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रमोद खंडाते, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा कुरसंगे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रशांत उईके, डॉ. माधुरी माथूरकर व आरोग्य विभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.
जिल्हा टार्स्क फोर्स, जिल्हा समन्वय समिती नियमीत लसिकरण, प्रधानमंत्री सुरक्षित मात्रृत्व अभियान, प्रधानमंत्री मात्रृ वंदना योजना, पिसीपीएनडिटी व जिल्हा गुणवत्ता आश्वासन समितीचा आढावा या बैठकीत घेण्यात आला. नियमित लसिकरणाबाबत बोलतांना जिल्हाधिकारी म्हणाले की, प्रत्येक बालकाला लसिकरण करणे अनिवार्य आहे. लसिकरणातून एकही बालक सुटता कामा नये. लसिकरणाचे उद्दीष्ट नियमितपणे पुर्ण करण्यात यावे. नियमित लसिकरणाचा सुक्ष्म आराखडा तयार करून काटेकोर अमलबजावणी करावी, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.
प्रसुतीपुर्व निदानतंत्रे कायद्याची अंमलबजावणी मोठ्या प्रमाणात करावी असे ते म्हणाले. जिल्हयाचे लिंग गुणसुत्र प्रमाण कमी असल्याचे नमुद करून जिल्हाधिकारी म्हणाले की, या विषयी जनजागृती करण्यात यावी. गर्भाचे प्रसुतीपुर्व लिंग निदान होणार नाही यासाठी आरोग्य विभागाने दक्षता बाळगावी. अशा घटना आढळल्यास प्रसंगी कठोर कारवाई करावी. कोविड-19 व्हॅक्सिन बाबत केंद्र सरकारने दिलेल्या मागदर्शक सुचनांबाबत या बैठकीत चर्चा करण्यात आली.
प्रधानमंत्री सुरक्षित मात्रृत्व अभियानात प्रत्येक गरोदर मातेला प्रसुतीपुर्व काळात उच्च दर्जाची प्रसुतीपुर्व सेवा, तपासण्या व समुपदेशन तसेच उत्तम आरोग्य सेवा दिल्या जातील याची आरोग्य विभागाने दक्षता घ्यावी. प्रधानमंत्री मात्रृ वंदना योजना ही केंद्र शासनाची महत्वाकांशी योजना असून 1 जानेवारी 2017 नंतर पहिल्यांदा ज्या मातांची प्रसुती झाली आहे किंवा गर्भधारणा झाली असेल व त्यांनी शासनाने अधिसुचीत केलेल्या संस्थेत नोंदणी केली असेल अशा पात्र मातांचा या योजनेत समावेश होतो. पात्र लाभार्थ्यांना 5 हजार रूपये लाभ देण्यात येतो. भंडारा जिल्हयात आता पर्यंत 28 हजार 614 लाभार्थ्यांना लाभ देण्यात आल्याची माहिती आरोग्य विभागाने बैठकीत दिली.
राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत नॅक्स, कायाकल्प व लक्ष या गुणवत्तेवर जिल्हयातील रूग्णालये पात्र ठरावित अशी अपेक्षा जिल्हाधिकाऱ्यांनी व्यक्त केली. उत्कृष्ट आरोग्य सेवा पुरविणाऱ्या शासकीय रूग्णालयांना केंद्र शासनातर्फे पारितोषिक देण्याची ही योजना असून भंडारा जिल्हातील रूग्णालयात उच्च दर्जाच्या सुविधा निर्माण करून जास्तीत जास्त रूग्णालय या स्पर्धेत पात्र ठरावी, असे प्रयत्न आरोग्य विभागाने करावे असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. उत्तम आरोग्य सेवा मिळणे हा नागरिकांचा अधिकार असून आरोग्य विभागाने आपल्या सेवा अद्ययावत करण्यासोबतच लोकाभिमुख कराव्या असे ते म्हणाले.