डॉ.श्यामाप्रसाद मुखर्जी जन वन विकास योजनेत मानव वन्यजीव संघर्ष तीव्र असलेल्या 33 गावांचा नव्याने समावेश – संजय राठोड

0
110

मुंबई, दि. 11 : डॉ.श्यामाप्रसाद मुखर्जी जन वन विकास योजनेत यवतमाळ व नांदेड जिल्ह्यातील मानव – वन्यजीव संघर्ष तीव्र असलेल्या व वाघ भ्रमण मार्गात येणाऱ्या  33 गावांचा नव्याने समावेश करण्यात आला असल्याची माहिती वन मंत्री संजय राठोड यांनी दिली.

 डॉ.श्यामाप्रसाद मुखर्जी जन-वन विकास योजना राज्यात राबवण्यात  येत आहे. जन, जल, जंगल व जमीन या संसाधनांचा शाश्वत विकास करणे व मानव – वन्यप्राणी संघर्ष कमी करणे  हे  या योजनेचे उद्दिष्ट आहे. या योजनेअंतर्गत ग्रामीण जनतेचा सहभाग घेऊन संयुक्त वन व्यवस्थापन समिती व परिस्थितीकीय विकास समिती यांच्यामार्फत कामकाज करण्यात येत आहे.

 यामुळे गावातील संसाधनांची उत्पादकता वाढवली जात असून त्यामुळे राज्यात पर्यायी रोजगार निर्माण होत आहे. ही योजना प्रामुख्याने बफर क्षेत्र, वनालगत असलेली गावे, वन्यप्राणी भ्रमण मार्ग गावे, ग्रामवने, व्याघ्र प्रकल्प व अभयारण्यापासून दोन किलोमीटर मधील गावे तसेच मानव- वन्यजीव संघर्ष गावे यांचा समावेश करून राबवली जात आहे. भविष्यात या योजनेची व्याप्ती वाढविण्याबाबत कार्यवाही केली जाणार असून वन्यजीव –  मानव संघर्ष कमी करण्यास प्राथमिकता दिली जाणार आहे, अशी माहितीही श्री.राठोड यांनी दिली.