भंडारा दि.11 : राज्य परिवहन महामंडळामार्फत साधारण, लांबपल्ला, मध्यम लांबपल्ला, शिवशाही, निमआराम व आंतरराज्य फेऱ्या सुरू करण्यात आलेल्या आहेत. त्या अनुषंगाने दिवाळी सणासाठी 44 जादा गाड्या प्रवाशांना उपलब्ध करून दिल्या असून 16 हजार 823 कि.मी. चे अतिरिक्त नियोजन करण्यात आले आहे. या जादा गाड्या 12 नोव्हेंबर पासून प्रवाशांच्या सेवेत असणार आहेत. या जादा फेऱ्यांचा प्रवाशांनी लाभ घ्यावा असे आवाहन विभाग नियंत्रण विनायक गव्हाळे यांनी केले आहे.
रा.प. भंडारा विभागाअंतर्गत भंडारा व गोंदिया जिल्हयात रा.प. बस सुविधा पुरविण्यात येते. दिनांक 22 मार्च 2020 पासुन शासन निर्णयानुसार कोविड-19 च्या अनुषंगाने रा.प. सेवा स्थगित ठेवण्यात आली होती. सध्या शासनाच्या धोरणानुसार लॉकडाऊन शिथील केल्याने टप्याटप्याने भंडारा विभागातील सर्व लांबपल्ला, मध्यम लांबपल्ला, शिवशाही, जलद, निमआराम, आंतरराज्य (गडचिरोली, चंद्रपूर, नागपूर, वर्धा, यवतमाळ, नांदेड, अमरावती, अकोला, बुलढाणा, औरंगाबाद) जिल्हयातील फेऱ्या सुरू करण्यात आल्या आहे. तसेच भंडारा व गोंदिया जिल्हयाअंतर्गत असणाऱ्या तालुक्यातील (तुमसर, मोहाडी, रामटेक, मौदा, तिरोडा, गोंदिया, आंमगांव, सालेकसा, देवरी, गोरेंगाव, स/अर्जुनी, मो/अर्जुनी, साकोली, लाखनी, लाखांदूर, पवनी) साधारण फेऱ्या सुरू करण्यात आलेल्या आहेत. प्रवाशांनी कोविड-19 च्या नियमांचे पालन करून आपला प्रवास करावा असे आवाहन करण्यात आले आहे.