गोवारी जमातीला मिळालेल्या न्यायाला विरोध करणार्‍या तथाकथीत संघटनांवर कारवाई

विधानसभा अध्यक्ष पटोले यांना निवेदन

0
358

गोंदिया : कित्येक वर्षांपासून गोवारी जमातीला अनुसूचित जमातीच्या सोई-सवलती मिळण्याची  मागणी शासन दरबारी प्रलंबित होती. त्याचा पाठपुरावा सर्व स्तरावरुन आदिवासी गोवारी संघटनांच्या वतीने करण्यात आला. या संदर्भात लढा उभारण्यात आला. यात ११४ निष्पाप गोवारी बांधवांना बळी गेला. पुढे समाज संघटनांच्या वतीने न्यायालयीन लढा उभारण्यात आला. याला यश आले आणि १४ ऑगस्ट २०१८ रोजी गोवारी हे आदिवासीच असल्याचा निर्वाळा उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने दिला. परंतु, यावर काही राजकीय, सामाजिक संघटनांनी आक्षेप घेत आवाहन दिले. त्यामुळे गोवारी जमातीला मिळालेल्या नैसर्गिक न्यायाला विरोध करणार्‍या तथाकथीत संघटना व त्यांच्या प्रमुख प्रतिनिधींवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी आदिवासी गोवारी संघर्ष कृती समिती गोंडवानाच्या वतीने करण्यात आली आहे. या संदर्भात विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांना निवेदन सादर करण्यात आले आहे.
गोंड गोवारी वेगळी जात आहे. म्हणून गोवारी जमातीवर अन्याय करण्यात येत होता. अखेर २००५-२००६ च्या अहवालानुसार गोंड गोवारी जात असल्याचे पुरावे आढळून आले नाहीत. त्यामुळे गोवारींना त्यांच्या हक्कापासून वंचित ठेवता येणार नाही, असे खुद्द न्यायालयाने दिलेल्या निर्वाळातून व्यक्त केले. उच्च न्यायालयाच्या आदेशान्वये गोवारी जमातीला अनु.जमातीचे प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणत मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आणि न्याय मिळाला या नैसर्गिक न्यायाला सुध्दा तथाकथीत आदिवासी संघटना व त्यांच्या मोहरक्यांनी संविधानातील प्रावधानांना प्रमाण न मानता उच्च न्यायालयाच्या आदेशाची अवहेलना करणे सुरू केले आहे. संविधानाचे पालन न करणारे हे देशद्रोही आहेत. तेव्हा गोवारी जमाती प्रकरणी कुणाच्याही दबावात न येता, वस्तुस्थिती स्विकारली पाहिजे. म्हणून गोवारी जमातीच्या न्यायाला विरोध करणार्‍या तथाकथीत संघटना व त्यांच्या प्रमुखांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी निवेदनातून आदिवासी गोवारी संघर्ष कृती समिती गोंडवानाच्या वतीने करण्यात आली आहे. या संदर्भात विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांना निवेदन देण्यात आले. यावेळी आदिवासी गोवारी संघर्ष कृती समिती गोंडवानाचे अध्यक्ष क्रिष्णा सर्पा, प्रकाश फुन्ने, जगदिश शेद्रे, अनिल बोपचे, के.के.नेवारे, रूपचंद राऊत, राजेंद्र बोपचे, दिनेश कोहळे, गजबे गुरूजी, रामेश्वर वाघाडे, सुंदर बक्चुरिया, दामोदर नेवारे आदि उपस्थित होते.