अंदाज समितीने घेतला बावनथडीचा आढावा

0
7

विशेष प्रतिनिधी
भंडारा दि. ९:सिंचन प्रकल्पाची पाहणी करण्यासाठी आलेल्या अंदाज समितीने मंगळवारला तुमसर तालुक्यातील आंतरराज्यीय बावनथडी सिंचन प्रकल्पाची पाहणी केली. यावेळी या समितीने प्रकल्पाचा आढावा घेतला.ही समिती पवनी तालुक्यातील गोसेखुर्द प्रकल्पाची पाहणी करणार होते परंतु यापूर्वीच मुख्यमंत्र्यांनी या प्रकल्पाची पाहणी केल्यामुळे या समितीने बावनथडीची पाहणी केली.
आज ९ सप्टेंबरला विदर्भातील अन्य प्रकल्पांची पाहणी करणार आहे. त्यानंतर नागपूर येथे संबंधित अधिकार्‍यांची बैठक घेऊन राज्य सरकारला निरीक्षण अहवारल सादर करणार आहे.जालनाचे आमदार अर्जुन खोतकर अध्यक्ष असलेल्या या समितीत नऊ आमदारांनी मंगळवारला दुपारी ४ वाजताच्या सुमारास तुमसर तालुक्यातील बावनथडी सिंचन प्रकल्प स्थळाला भेट देऊन पाहणी केली.
या दौर्‍यात समितीचे अध्यक्ष आमदार अर्जुन खोतकर यांच्यासोबत तुमसरचे आमदार चरण वाघमारे, उत्तर नागपूरचे आमदार मिलिंद माने, यवतमाळचे आमदार मदन येरावार, कोरेगावचे आमदार शशिकांत शिंदे, धामनगावचे आमदार विरेंद्र जगताप, नेवासाचे आमदार बाळासाहेब मुरकुटे, नागपूरचे आमदार अनिल सोले उपस्थित होते.
या अंदाज समितीने बावनथडी प्रकल्पाचे सुक्ष्मरित्या निरीक्षण करुन भौगोलिक स्थितीचा आढावा घेतला. त्यानंतर प्रकल्पाच्या प्रलंबित कामाची माहिती घेतली. भुमी संपादित किती शेतकर्‍यांना नुकसान भरपाई देणे यासह प्रस्तावित कामांचा आढावा घेतला.समितीच्या सदस्यांनी सुमारे तीन तास प्रकल्प स्थळावर पाहणी केली.या दरम्यान त्यांनी प्रकल्पबाधित शेतकर्‍यांच्या समस्या जाणून घेतल्या. या समितीच्या दौर्‍यात विदर्भ सिंच विकास महामंडळाचे निदेशक शुक्ला, भंडाराचे जिल्हाधिकारी धीरजकुमार, मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र निंबाळकर उपस्थित होते.
आंतरराज्यीय बावनथडी सिंचन प्रकल्प २0१२ मध्ये पूर्ण झाला आहे. ११९ शेतकर्‍यांना भूमी संपादनासाठी ७२ कोटी रुपयांची गरज आहे. अपूर्ण कामांसाठी ११ कोटी आणि प्रस्तावित कामांसाठी ३७ कोटी असे एकूण १२0 कोटी रुपयांची आवश्यकता आहे. अंदाज समितीच्या दौर्‍यामुळे आपण समाधानी असून आता बावनथडी प्रकल्पाच्या प्रलंबित कामांना वेग येईल. शेतकर्‍यांना लवकरच मोबदला मिळेल. प्रलंबित कामे पुर्ण करण्यात येईल, अशी प्रतिक्रिया अंदाज समितीचे सदस्य आमदार चरण वाघमारे यांनी दिली.