बोंडगावदेवी दि. ११: गावकऱ्यांनी एकमेकाबद्दलची हाडवैराची भूमिका स्वीकारू नये. लहान-मोठ्या कारणांवरून होणाऱ्या भांडणाला वाव न देता सृजनशीलता अंगिकारून गावातील वाद गावातच मिटविण्यासाठी महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीकडे धाव घेऊन सामोपचाराने तंट्यावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला जाईल. गावात शांती व सलोखा निर्मिती करण्याबरोबरच गावातील समस्या मार्गी लावण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करणार, अशी ग्वाही तंमुसचे अध्यक्ष तुळशीदास बोरकर यांनी दिली.
येथील महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीच्या अध्यक्षपदी बहुमताने निवड झाल्यानंतर ग्रामपंचायतच्या सभागृहात झालेल्या पहिल्या बैठकीत पदग्रहण केल्यानंतर ते बोलत होते.
अध्यक्षस्थानी तुुळशीदास बोरकर होते. याप्रसंगी समितीचे जेष्ठ पदाधिकारी सरपंच राधेश्याम झोळे, उपसरपंच वैशाली मानकर, निमंत्रक पोलीस पाटील मंगला रामटेके, माजी अध्यक्ष डॉ. शामकांत नेवारे, मु.धो. मानकर, भिवाजी शहारे, कुकसू मेश्राम, शेवंता मानकर, ग्रामसेवक एल.एम. ब्राम्हणकर, पतीराम मेश्राम उपस्थित होते. बोरकर पुढे म्हणाले, गावातील तंटे गावाबाहेर न जाता गावामध्ये सामोपचाराने निराकरण करून गावात शांतता कायम राहण्यासाठी सदस्यांनी सहकार्य करावे. न्यायनिवाडा प्रक्रियेत सहभागी होण्यास प्रथम प्राधान्य देण्याचे आवाहन त्यांनी केले. येत्या काही दिवसांत येणाऱ्या पोळा, गणपती उत्सवात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, भाऊबंदकी व एकोप्याने उत्सव साजरा करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे. काही असामाजिक तत्त्वांवर पायबंद घालण्यासाठी सामाजिक सुरक्षा दलाची नेमणूक करण्यासाठी युवकांनी पुढे यावे. गावात शांतता तसेच सलोखा वातावरण निर्मिती तंमुस प्रयत्न करेल, अशी ग्वाही देऊन संबंधिताना निवेदन देऊन समस्या मार्गी लावण्याला प्राधान्य देण्यात येईल. येथील आरोग्य केंद्रात, जि.प. आयुर्वेदिक दवाखान्यात गेल्या कित्येक महिन्यांपासून डॉक्टर नसल्याने ग्रामस्थांची गैरसोय होत आहे. डॉक्टरांच्या पूर्ततेसाठी तंमुसच्या वतीने जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना भेटून निवेदन दिले जाईल, असे बोरकर यांनी सांगितले. बैठकीला तंमुसचे अमरचंद ठवरे, संतोष टेंभुणेर, साधू मेश्राम, कृष्णा खंडाईत, अनिरूध्द रामटेके, द्वारका भैसारे, विजया मानकर आदी उपस्थित होते.