कोयासन विद्यापीठात अभूतपूर्व उत्साहात पुतळ्याचे अनावरण

0
12

डॉ. बाबासाहेबांना १२५व्या जयंतीवर्षात
लंडनपासूनटोकियोपर्यंत वैश्विक मानवंदना

मुंबई, दि. १० : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे यंदा १२५वे जयंती वर्ष साजरे करण्यात येत असतानाच त्यांना आज महाराष्ट्र शासनातर्फे सातासमुद्रापार झालेल्या अभूतपूर्व कार्यक्रमाच्या माध्यमातून जणू वैश्विक मानवंदना देण्यात आली. जपानच्या कोयासन विद्यापीठात अपूर्व उत्साहात झालेल्या अनोख्या कार्यक्रमात बाबासाहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले.बाबासाहेबांचे वास्तव्य असलेली लंडनमधील वास्तू खरेदीची प्रक्रिया मार्गी लावतानाच टोकियोतील पुतळ्याच्या अनावरणातून राज्यघटनेच्या थोर शिल्पकाराच्या गौरवाचे एक चक्र जणू राज्य शासनाने पूर्ण केले आहे.
महाराष्ट्र शासनातर्फेयंदा डॉ. बाबासाहेबांचे १२५वे जयंती वर्ष मोठ्या उत्साहात साजरे करण्यात येत आहे. या वर्षात इंदूमिलच्या जागेवरील स्मारकाच्या उभारणीचा प्रश्न सरकारने मार्गी लावला आहे. तसेच आंतरराष्ट्रीय स्मारकासाठी बाबासाहेबांचे लंडनमधील वास्तव्य असलेली वास्तू खरेदी करण्याची प्रक्रियाही गेल्याच आठवड्यात मार्गी लागली आहे. या पाठोपाठ आज जपानमधील या कार्यक्रमाच्या माध्यमातून राज्य शासनाने बाबासाहेबांना अनोखी आदरांजली वाहिली आहे.
या अतिशय शानदार आणि भावपूर्ण सोहळ्यात मुख्यमंत्री म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा येथील पुतळा महाराष्ट्र आणि भारताच्या जनतेकडून कोयासन आणि जपानच्या नागरिकांना दिलेली एक अमूल्य भेट आहे.वाकायामाचे गव्हर्नर योशिनोबूनिसाका, राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई, खासदार रामदास आठवले, खासदार अमर साबळे,माजी राज्यमंत्री सुलेखा कुंभारे आदी यावेळी उपस्थित होते.
कोयासन आपल्या स्थापनेचे १२००वे वर्ष साजरे करीत असून भारतासह जगभरात बाबासाहेबांचे १२५वे जयंती वर्ष साजरे होत आहे. या पार्श्वभूमीवर आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने एक ऐतिहासिक आणि महत्त्वाचे औचित्य जुळून आले आहे, असे गौरवोद्‌गार काढून मुख्यमंत्री म्हणाले, बाबासाहेब जगातील आघाडीच्या बुद्धिस्ट नेत्यांपैकी एक होते. प्रख्यातविधिज्ञ, नेते आणि समाजसुधारक अशी त्यांची जगभर ओळख होती. बुद्धधम्माची तत्त्वे आणि शिकवण त्यांनी आयुष्यभर जपली, त्यातून त्यांनी अनेकांचे आयुष्य समृद्ध केले.कायामाचे गव्हर्नर निसाका आणि त्यांच्या सहकाऱ्यांसह कोयासन मंदिर व्यवस्थापन आणि कोयासन विद्यापीठाचेही मुख्यमंत्र्यांनी आभार मानले. महाराष्ट्र संस्कृतीचे प्रतीक म्हणून उपस्थित पाहुण्यांसह जपानी नेत्यांनीही उत्साहात भगवे फेटे बांधले. तुतारी वाजवून सर्वांचे स्वागत करण्यात आले.या सोहळ्यास विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. संपूर्ण वातावरण भारावलेले होते. यानिमित्ताने महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळातर्फे डॉ. आंबेडकर आणि बुद्धिझम या विषयावरील सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.