‘पुण्य नगरी’चे कार्यकारी संपादक अविनाश दुधे व ज्येष्ठ पत्रकार रघुनाथ पांडे होणार सन्मानित
नागपूर दि. १३: विदर्भ गौरव प्रतिष्ठान व नागपूर श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने दिला जाणारा ‘अनिलकुमार स्मृती पत्रकार पुरस्कार-२0१४’ वितरण सोहळा रविवारी संध्याकाळी ५.३0 वाजता पंचशील चौक येथील श्रमिक पत्रकार संघाच्या सभागृहात आयोजित करण्यात आला आहे.
स्व. अनिलकुमार यांच्या स्मृतिदिनानिमित्त हा पुरस्कार पत्रकारितेत उल्लेखनीय कार्य करणार्या पत्रकारांना दिला जातो. यंदा या पुरस्कारासाठी ‘पुण्य नगरी’चे कार्यकारी संपादक अविनाश दुधे व ज्येष्ठ पत्रकार रघुनाथ पांडे यांची निवड करण्यात आली आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते हा पुरस्कार पत्रकारद्वयींना प्रदान करण्यात येईल. यावेळी अध्यक्षस्थानी माजी खा. दत्ता मेघे उपस्थित राहतील. तर, प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय मंत्री हंसराज अहीर व माजी खा. बनवारीलाल पुरोहित उपस्थित राहणार आहेत. या सोहळय़ाला नागरिकांनी मोठय़ा संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.