वडेगावच्या अर्थशतकी तान्हा पोळ्याला जि.प. देणार पाठबळ

0
9

तिरोडा दि.१४:तालु्क्यातील वडेगाव येथे रविवारी साजरा झालेला ५६ वा तान्हा पोळा तिरोडा तालुक्यासाठीच नाही तर संपूर्ण गोंदिया जिल्ह्यासाठी गौरवाची बाब ठरला. या ‘अर्धशकती’ परंपरा लाभलेल्या तान्हा पोळ्याला जिवंत ठेवण्यासाठी आपण जि.प.स्तरावर नक्कीच सर्व प्रकारचे पाठबळ मिळवून देण्याचे आश्वासन जिल्हा परिषदेचे शिक्षण व आरोग्य सभापती पी.जी. कटरे यांनी दिले.
तान्हा पोळा उत्सव समिती वडेगावच्या वतीने मंडई चौकात आयोजित यावर्षीच्या तान्हा पोळा कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून जि.प. अध्यक्ष उषाताई मेंढे, उद्घाटक आमदार विजय रहांगडाले, नंदीपूजक जि.प.चे सभापती पी.जी. कटरे, सांस्कृतिक कार्यक्रमाचे उद्घाटक माजी आ.दिलीप बन्सोड, भूमीपूजक पं.स.सभापती उषा किंदरले आदी होते.
अतिथींच्या हस्ते दीप प्रज्वलन व तैलचित्राच्या पूजनानंतर कार्यक्रमाची रितसर सुरुवात करण्यात आली. यावेळी जनता भजन मंडळातर्फे भोजराम पटले यांच्या मार्गदर्शनात विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले. याप्रसंगी महादेव-पार्वतीसह विविध आकर्षक देखावे सादर लक्ष वेधून घेत होते.
यावेळी सुमारे ५८0 बाळ नंदीधारक आपल्या नंदीसह शेतकर्‍यांच्या वेशभुषेत सहभागी झाले होते. त्यातील उत्कृष्ट ५0 नंदीधारकांना विविध बक्षीसे देऊन सन्मानित करण्यात आले. उत्कृष्ट नंदीचे परीक्षण ग्रामसेवक गिरीष भेलावे, गुरव व राऊत यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन हिवराज रहांगडाले, आभार मोरेश्‍वर ठाकरे यांनी मानले.
कार्यक्रमासाठी तान्हा पोळा समितीचे अध्यक्ष रामलाल रहांगडाले, सचिव मेघराज चावके, राजेश कावळे, अंकुश राठोड, पुरण टेंभरे, संभाजी ठाकरे, ग्राम सुरक्षा दलाचे सदस्य तंटामुक्त समितीचे पदाधिकारी, ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, विविध संस्थेचे पदाधिकारी व गावकर्‍यांनी परिश्रम घेतले.
यावेळी गोंदिया जिल्हा म.स.बँकेचे उपाध्यक्ष राधेलाल पटले, जि.प.चे माजी उपाध्यक्ष पंचम बिसेन, प्रेम रहांगडाले, जि.प. सदस्य सुनिता मडावी, पं.स.सदस्य निता रहांग़डाले, सरपंच तुमेश्‍वरी बघेले, संजयसिंह बैस, यमू नंदेश्‍वर, सेवा सहकारीचे अध्यक्ष डॉ.गिरधर बिसेन, माजी पं.स. सदस्य तेजराम चव्हाण, उपकार्यकारी अभियंता गोवर्धन बिसेन आदी प्रामुख्याने उपस्थित होते.