चंद्रपूर जिल्ह्यातील नदी-नाले तुडूंब

0
6

चंद्रपूर दि.१८: संपूर्ण जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले अहे. या संततधार पावसाने जिल्ह्यातील नदी-नाले तुडूंब भरले असून काही भद्रावती, मूल, कोरपना आदी तालुक्यातील काही गावांतील नागरी वस्त्यांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांची तारांबळ उडाली आहे. अनेक ठिकाणी वीज पुरवठा खंडीत झाल्याने नागरिकांचे हाल होत आहेत.बुधवारी दुपारपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसादरम्यान, लगतच्या बीटीएस प्लांटच्या मोबाईल टॉवरवर वीज कोसळल्याने टॉवर क्षतीग्रस्त झाले. पावसामुळे फिडरमध्ये बिघाड झाल्याने बल्लारपूरवासियांना बुधवारची रात्र अंधारात काढावी लागली. वीज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी बिघाड आलेला फिडर दुरूस्त केला न केला तोच दुसऱ्या फिडरमध्ये बिघाड आला. त्यामुळे रात्रभर वीज पुरवठा खंडीत होता. त्यामुळे नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला.
धुव्वादार पावसामुळे नदी-नाल्यांना पूर आला आहे. परिणामी राजुरा-कोरपना या तालुक्यातील अनेक मार्ग वाहतुकीसाठी बंद झाले आहेत. त्यात कोरपना तालुक्यातील कोरपना-अदिलाबाद, नांदा-कोरपना, राजुरा कोरपना, शरद (बु.)-शरद (खु.) पिपरी-कोडशी, परसोडा ते परसोडा फाटा हे रस्ते बंद झाले आहेत. या पावसामुळे बाजारपेठांवरही परिणाम झाला असून कोरपना शहरातील बाजारपेठ आज दिवसभर ठप्प होता. दरम्यान, गेल्या २० तासांपासून कोरपना शहर अंधारात आहे. बिघाड दुरूस्तीचे काम सुरू असल्याचे वीज वितरण कंपनीकडून सांगण्यात आले. जीवती तालुक्यातील पाटण येथील वीज पुरवठाही गेल्या अनेक तासांपासून खंडीत आहेत. त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे.