संत रविदास महाराजांच्या स्मारकासाठी जागा उपलब्ध करणार

0
10

नागपूर दि.२१:: चर्मकार समाजाचे आद्यदैवत श्री संत रविदास महाराज यांच्या भव्य स्मारकासाठी नागपूर शहरात राज्य सरकारच्या माध्यमातून जागा उपलब्ध करण्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी दिली.

चर्मकार सेवा संघाच्या नागपूर शहर व ग्रामीण शाखेतर्फे शिक्षक सहकारी बँके च्या सभागृहात आयोजित चर्मकार समाजातील गुणवंतांचा सत्कार व समाज मेळाव्याच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी केंद्रीय परिवहन व जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी तर प्रमुख पाहुणे म्हणून सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले उपस्थित होते.

चर्मकार समाजावर वर्षानुवर्षे अन्याय झाला. समाजबांधवांना हालअपेष्टा सहन कराव्या लागल्या. समाजाच्या प्रगतीसाठी शिक्षणाचा अधिक प्रसार झाला पाहिजे. युुवकांना चांगले शिक्षण व प्रशिक्षण मिळाले पाहिजे. समाजाच्या प्रगतीसाठी राज्य सरकारच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा लाभ गरजूंना मिळावा; यासाठी सरकार प्रयत्नशील असून आधीच्या तुलनेत दुप्पट मदत देण्याचे आश्वासन फडणवीस यांनी दिले.
चर्मकार सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष भय्यासाहेब बिघाणे समाजाच्या उन्नतीसाठी तळमळीने व नि:स्वार्थ भावनेने करीत असलेले कार्य प्रशंसनीय आहे. श्री संत रविदास महाराज यांच्या स्मारकासाठी जागा उपलब्ध करण्याचा निर्णय राज्य सरकार घेईल, अशी ग्वाही नितीन गडकरी यांनी दिली.चर्मकार महामंडळाकडे ३०० कोटींचे भागभांडवल आहे. या माध्यमातून समाजातील सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार उपलब्ध व्हावा. सरकारतर्फे जिल्हास्तरावर कौशल्य विकास प्रशिक्षण मेळाव्याचे आयोजन करण्याची घोषणा राजकुमार बडोले यांनी केली.