गणेशोत्सवातून लोकचळवळ निर्माण व्हावी-नाना पटोले

0
8

लोकनाथ गिर्‍हेपुंजे भंडारा भूषण पुरस्काराने सन्मानित

भंडारा दि. २७: गणेशोत्सवातून मंडळांनी सामाजिक बांधिलकी जोपासत असताना मंडळांकडून राबविले जाणारे उपक्रम समाजासाठी प्रेरणादायी ठरावे. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी गणेशोत्सवाची सुरुवात लोकचळवळीसाठी केली होती. त्याचे अनुकरण करुन गणेश मंडळांनी सामाजिक बांधिलकीचा वसा जोपासावा, असे प्रतिपादन खासदार नाना पटोले यांनी केले.
भंडार्‍याचा राजा गणेश मंडळाच्यावतीने शनिवारला ‘भंडारा भूषण’ २0१५ या पहिल्या पुरस्काराचे वितरण समारंभात ते बोलत होते. या पुरस्कार वितरण समारंभात नगराध्यक्ष बाबूराव बागडे, आमदार रामचंद्र अवसरे, माजी राज्यमंत्री नाना पंचबुद्धे, अर्बन बँकेचे संचालक धनंजय दलाल, तहसीलदार सुनील बन्सोड, मंडळाचे अध्यक्ष अजय वंजारी, मुकेश थानथराटे, सामाजिक कार्यकर्ते सुनिल मेंढे मंचावर उपस्थित होते.
यावेळी ‘भंडारा भूषण’ पुरस्कार जिल्ह्यातील पहिले एमबीबीएस पदवीप्राप्त ८६ वर्षीय डॉ.लोकनाथ गिर्‍हेपुंजे यांना प्रदान करण्यात आला. शाल-श्रीफळ, स्मृतिचिन्ह, मानपत्र आणि ११ हजार रुपये रोख असे या पुरस्काराचे स्वरूप होते.
याप्रसंगी खा. पटोले म्हणाले, भंडार्‍याचा राजा मंडळाचे दरवर्षीचे उपक्रम हे प्रेरणादायी आहे. डॉ.गिर्‍हेपुंजे यांनी रुग्णसेवा केली तो काळ खर्‍या अर्थाने समाजसेवा ठरावी असा होता.
सत्कार सोहळ्यात मनोगत व्यक्त सत्कारमूर्ती डॉ.गिर्‍हेपुंजे म्हणाले, हा माझा एकट्याचा सत्कार नसून भंडारावासियांचा हा सत्कार आहे.
यावेळी नगराध्यक्ष बाबूराव बागडे यांनी शहरातील छोटाबाजार येत्या काही दिवसात या परिसरातून हलविण्यात येणार असून या परिसराचे सौंदर्यीकरण करण्यात येणार आहे. हे काम येत्या दोन महिन्यात पूर्ण करून शहराच्या सौंदर्यीकरणात भर घालण्याचा आपला मानस आहे. याप्रसंगी आ.रामचंद्र अवसरे, धनंजय दलाल यांचीही भाषणे झाली. प्रास्ताविक मंडळाचे अध्यक्ष अजय वंजारी यांनी केले. संचालन रामधन धकाते यांनी तर आभारप्रदर्शन मंगेश वंजारी यांनी केले.