मिशन इंद्रधनुष : बालके व गरोदर मातांचे संपूर्ण लसीकरण करा – डॉ. विजय सूर्यवंशी

0
15

गोंदिया,दि.७ : ० ते २ वर्ष वयोगटातील बालके व गरोदर माता ज्यांना राष्ट्रीय लसीकरण वेळापत्रकानूसार पूर्वी देय असणाऱ्या सर्व लसीच्या मात्रा मिळालेल्या नाही. अशा सर्व असुरक्षित बालकांचे व गरोदर मातांचे संपूर्ण लसीकरण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात लसीकरणाच्या मिशन इंद्रधनुष दुसऱ्या टप्प्याला ७ ऑक्टोबरपासून सुरुवात करण्यासाठी मंगळवारी आयोजित सभेत जिल्हाधिकारी डॉ. सूर्यवंशी बोलत होते. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप गावडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. रवी धकाते, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. विनोद वाघमारे, बाई गंगाबाई शासकीय स्त्री रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. संजीव दोडके व युनिसेफ कन्सल्टंट डॉ. विश्वजीत भारद्वाज यांची प्रमुख उपस्थिती होती.
डॉ. सूर्यवंशी पूढे म्हणाले, बालकांमधील मृत्यू व आजारपणाचे प्रमाण कमी करण्यासाठी लसीकरण हे प्रभावी माध्यम आहे. जिल्हयातील आशा कार्यकर्ती, आरोग्य सेविका, अंगणवाडी सेविकांच्या विशेष सहकार्यातून मिशन इंद्रधनुषचा दूसरा टप्पा यशस्वी करा. एकही बालक व गरोदर माता लसीकरणापासून वंचित राहणार नाही याची काळजी घेण्याचे आवाहनही त्यांनी याप्रसंगी केले.
श्री. गावडे म्हणाले, आरोग्य कर्मचाऱ्यांनी लसीकरणाचे काम मिशन म्हणून करावे. सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रात जाऊन नावे नोंदणी करुन १०० टक्के लसीकरण करावे. असे ते म्हणाले.
इंद्रधनुष मोहिम ७ ते १३ ऑक्टोबर, १६ ते २२ नोव्हेंबर, १६ ते २२ डिसेंबर आणि २५ जानेवारी ते ३१ जानेवारी २०१६ या दरम्यान राबविण्यात येणार आहे. या मोहिमेत टीटी-१, टीटी-२, डीपीटी, ओपीव्ही, हिपॅटायटस-१,२,३, गोवर १,२, बुस्टर व व्हिटॅमिन ए १,२ यासह बालक तसेच गरोदर मातांना आरोग्य विभागाने ठरवून दिलेल्या लसीचा समावेश राहणार असल्याची माहिती अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गहलोत यांनी यावेळी दिले. सभेला सर्व तालुका आरोग्य अधिकारी, बाल विकास प्रकल्प अधिकारी, आरोग्य विभागातील अधिकारी व पर्यवेक्षक उपस्थित होते.