महाराजस्व अभियान शिबीरातून अनेकांचे समाधान

0
17

१९७३ जातीचे, १५९७ रहिवासी व ५२३८ उत्‍पन्नाचे दाखले वाटप
१३०० फेरफार निकाली
गोंदिया,दि.७ : महसूल विभाग प्रशासनाचा कणा म्हणून ओळखला जातो. या विभागाशी संबंधित शेतकरी व सामान्य जनतेचे प्रश्न निकाली काढण्यासाठी महसूल प्रशासन अधिक गतीमान, लोकाभिमुख, पारदर्शक आणि कार्यक्षम करण्यासाठी महाराजस्व अभियान हा महत्वाकांक्षी कार्यक्रम जिल्हयात १ ऑगस्ट या महसूल दिनापासून राबविण्यात येत आहे. विविध दाखले शिबीरासह विस्तारीत समाधान योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे दोन महिन्यात महाराजस्व अभियानाच्या माध्यमातून अनेकांचे समाधान करण्यात आले.
महाराजस्व अभियानाच्या माध्यमातून जिल्हयातील आठही तालुक्यात ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात विविध दाखले वाटपाचे शिबीर, विस्तारीत समाधान योजनेचे शिबीर, महसूल अधिकाऱ्यांकडील अर्धन्यायीक प्रकरणांचा जलदगतीने निपटारा करण्यासाठी महसूल अदालती, फेरफार अदालती, भूसंपादन केलेल्या प्रकरणी कमी जास्त प्रकरणे तयार करुन गांव दफ्तरी सर्व उतारे योग्यप्रकारे सुधारीत करणे, गांव नकाशाप्रमाणे अतिक्रमितव बंद झालेले गाडी रस्ते, अनधिकृत अकृषक वापराबाबत शोध मोहिम राबविणे व निकाली काढणे, शासकीय जमीनीवरील अतिक्रमणे निष्कासन मोहिम राबविणे, इनाम व वतन जमीन शर्तभंग तपासणी व कार्यवाही करणे आणि चावडी वाचन करण्याचे काम करण्यात आले.
विविध प्रकारचे दाखले देण्यात येणाऱ्या शिबीरातून १९७३ व्यक्तींना जातीचे दाखले, १५९७ जणांना रहिवासी असल्याचे दाखले तर ५२३८ व्यक्तींना उत्पन्नाचे दाखले वाटप करण्यात आले.
विस्तारीत समाधान योजनेच्या १८ शिबीरात नागरिकांचे २८८४ अर्ज प्राप्त झाले. त्यापैकी १७७५ दाखल्यांचे वाटप नागरीकांना करण्यात आले. महसूल अधिकाऱ्यांकडील प्रकरणांचा जलदगतीने निपटारा करण्यासाठी ७७ महसूल अदालती आयोजित करण्यात आल्या. या अदालतीमध्ये सहा महिन्यांपेक्षा प्रलंबीत ३३७१ प्रकरणे होती. त्यापैकी ३५९ प्रकरणांचा निपटारा करण्यात आला. एक महिन्यापेक्षा जास्त प्रलंबीत असलेल्या फेरफारपैकी १३०० फेरफार निकाली काढण्यात आले. यासाठी ६५ फेरफार अदालती घेण्यात आल्या. मागील दोन महिन्यात २१ पांदण रस्त्यावरील अतीक्रमणे हटविण्यात आली असून जवळपास १२ कि.मी. रस्ते मोकळे करण्यात आले. जमिनीच्या अनधिकृत अकृषक वापराबाबत शोध मोहिम राबवून १४ प्रकरणे निकाली काढण्यात आली. शोध मोहिमेतून १७ लक्ष ८० हजार २१७ रुपये वसूल करण्यात आले. शासकीय जमीनीवरील अतिक्रमण निष्कासन मोहिम राबवून ८५ प्रकरणे निकाली काढण्यात आली.
चावडी वाचनाचा कार्यक्रम ऑगस्‍ट महिन्यात ४२१ गावात व सप्टेंबर महिन्यात २९३ गावात घेण्यात आला. यामध्ये १२२७५ मय्यत खातेदार आढळून आले. २०४५ शिधापत्रिकाधारक अपात्र ठरले. १७१ लाभार्थी कमी करण्यात आले. ४७७ श्रावणबाळ योजनेचे लाभार्थी अपात्र ठरले. ३०१ ठिकाणी शासकीय जमीनीवर अतिक्रमण झाल्याचे आढळून आले.
महाराजस्व अभियानाच्या माध्यमातून विविध दाखले शिबीर, विस्तारीत समाधान शिबीर, फेरफार निकाली काढण्यासाठी मंडळ स्तरावर फेरफार अदालती, पांदण रस्ते मोकळे करणे, अकृषक वापराच्या प्रकरणांची शोध मोहिम यासह चावडी वाचन करण्यात आल्यामुळे महसूल विभागाशी संबंधित कामे त्वरीत पूर्ण करण्यात आल्यामुळे संबंधित नागरिकांच्या वेळेची व पैशाची बचत होण्यास मदत झाली.