बंदूर जंगलात चकमक: काही नक्षलवादी जखमी?

0
17

गडचिरोली, दि. १३: धानोरा तालुक्यातील सीमावर्ती भागातील सावरगाव पोलिस मदत केंद्रांतर्गत बंदूर जंगलात आज सकाळी पोलिस व नक्षल्यांमध्ये चकमक उडाली. या चकमकीत काही नक्षलवादी जखमी झाल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.
आज सकाळी विशेष अभियान पथकाचे जवान सावरगाव-गॅरापत्ती परिसरातील जंगलात नक्षलविरोधी अभियान राबवीत असताना बंदूर जंगलात नक्षल्यांनी पोलिसांवर गोळीबार केला. पोलिसांनी प्रत्युत्तर देताच नक्षलवादी घनदाट जंगलात पसार झाले. मात्र काही ठिकाणी रक्त सांडल्याचे आढळून आल्याने काही नक्षलवादी जखमी झाले असावेत, असा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. पोलिसांनी घटनास्थळावरुन काही पिट्टू व लिखित साहित्य ताब्यात घेतले आहे.

एका नक्षली महिला नेत्याशी असलेल्या प्रेमप्रकरणाची वाच्यता झाल्याने ज्येष्ठ माओवादी नेता व दंडकारण्य स्पेशल झोनल कमिटीचा सदस्य गजराला अशोक यास नक्षल्यांच्या कोअर कमिटीने पदावनत केल्याचे वृत्त आहे.
यासंदर्भात छत्तीसगडच्या पोलिस महानिरीक्षकांनी दिलेल्या माहितीचा हवाला देत गडचिरोली पोलिसांनी एक प्रसिद्धीपत्रक जारी केले आहे. त्यानुसार नक्षल्यांच्या स्पेशल झोनल कमिटीचा सदस्य गजराला अशोक याची पदावनती करुन त्याला केवळ विभागीय समितीचा सदस्य बनविण्यात आले आहे. माओवाद्यांची दंडकारण्य स्पेशल झोनल कमिटी ही दक्षिण छत्तीसगड, तसेच शेजारील तेलंगाणा, ओडिसा व महाराष्ट्राच्या सीमावर्ती भागाला नियंत्रित करीत असते. पोलिसांच्या हाती लागलेल्या दस्तऐवजानुसार, ४२ वर्षीय गजराला अशोक हा बंडखोर होता व नक्षल चळवळीत असलेल्या महिला नेत्यांशी त्याचे असलेल्या प्रेमसंबंधावरुन त्याची पदावनती करण्यात आली आहे. शिवाय विभागीय समिती सदस्य बेज्जारपू किसन व दंडकारण्य स्पेशल झोनल कमिटी सदस्य इंगोलापू या दोघांनादेखील प्रेमसंबंधाच्या कारणावरुनच पदावनत करण्यात आले होते, अशी माहिती छत्तीसगडचे पोलिस महानिरीक्षक(नक्षलविरोधी अभियान) दीपांशू काबरा यांनी दिली. नक्षल चळवळीतील कार्यकर्त्याने त्याची मैत्रिण किंवा पत्नीशी प्रेमसंबंध प्रस्थापित करुन सामाजिक आयुष्य जगण्याला नक्षल चळवळीत नियमांचे उल्लंघन समजले जाते. चळवळीत प्रेम, लग्न व मुलाचा विचार करावयाचा नाही, असे स्पष्ट निर्देश नक्षल चळवळीत दिले जात असल्याची माहिती आत्मसमर्पित नक्षल्यांनी पोलिसांना दिली आहे. एखादा सदस्य असे कृत्य करीत असल्याचे दिसताच ज्येष्ठ नेते त्यास नसबंदी करावयास सांगतात. चळवळीत कठोर नियम असतानाही प्रेमप्रकरणे पुढे येऊ लागल्याने हा विषय नक्षल चळवळीसाठी चिंतेचा विषय झाला आहे, शिवाय चळवळीला त्याचा फटका बसत आहे, असे पोलिसांना प्राप्त झालेल्या नक्षल्यांच्या कागदपत्रांवरुन दिसून येते, असे पोलिसांनी म्हटले आहे. नक्षल चळवळीमधील ज्या आजारी सदस्यांवर उपचार होत नाहीत, त्यांना उपचाराची सोय व शोषण होणाऱ्या नक्षल्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी पोलिस प्रयत्न करीत असल्याची माहिती छत्तीसगडचे पोलिस महानिरीक्षक दीपांशू काबरा यांनी दिल्याचेही गडचिरोली पोलिसांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.